शिर्डी( जनता आवाज वृत्तसेवा):- विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील विकासित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष आ.रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राज्यात भारतीय जनता पक्ष अधिक मजबूतीने काम करून मोठे यश मिळवेल असा विश्वास जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.
भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावर आ.रविंद्र चव्हाण यांची निवड झाल्याबद्दल मंत्री विखे पाटील यांनी अभिनंदन करुन, शुभेच्छा दिल्या आहेत. आ.रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून संघटनात्मक अनुभव असलेले नेतृत्व प्रदेशाध्यक्ष पदावर विराजमान झाल्याने कार्यकर्ते आणि पदाधिका-यां मध्ये मोठा उत्साह असल्याचे त्यांनी सांगितले.
आ.रविंद्र चव्हाण यांनी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या माध्यमातून आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. कल्याण डोंबीवली महानगर पालिका आणि डोबिवली विधानसभा मतदार संघाचे पहिले आमदार म्हणून त्यांनी विजयाची घोडदौड सुरु केली. सलग चार वेळा या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व ते करीत आहेत. सार्वजनिक जीवनात विकास कामांच्या प्रक्रीयेला पुढे जाण्याचा मोठा अनुभव तसेच एक कार्यकर्ता ते प्रदेशाध्यक्ष अशी त्यांची राहीलेली संघटनात्मक वाटचाल सर्वांसाठीच प्रेरणादायी असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.
महायुती सरकारमध्ये विविध मंत्री पदांचा कार्यभार सांभाळताना त्यांनी नागरी हिताचे निर्णय घेतले. यामध्ये प्राधान्याने राज्यातील रस्ते विकासामध्ये त्यांचे योगदान महत्वपूर्ण राहीले. सरकार आणि संघटना यातील योग्य समन्वय साधण्याचा अनुभव आ.रविंद्र चव्हाण यांच्या पाठीशी असल्याने राज्यात भाजपाच्या संघटनात्मक कामाला त्यांचे बहुमोल असे मार्गदर्शन निश्चित उपयुक्त ठरेल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य करीत असलेल्या विकासात्मक वाटचालीला संघटनेच्या माध्यमातून भक्कम असे पाठबळ उभे करून आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीतही विधानसभे प्रमाणेच भारतीय जनता पक्ष प्रथम स्थानावर यश मिळवेल असा विश्वास मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केला.