25.3 C
New York
Thursday, July 17, 2025

Buy now

spot_img
spot_img

संगमनेरचा सहकार पॅटर्न राज्यासाठी मार्गदर्शक – चंद्रशेखर बारी आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त अमृत उद्योग समूहात सहकार दिंडी संपन्न संगमनेर दूध संघामुळे शेतकऱ्यांना वर्षाला सुमारे 550 कोटी – रणजीतसिंह देशमुख

संगमनेर (जनता आवाज वृत्तसेवा):- महाराष्ट्रात सुरू झालेली सहकारी संकल्पना जगमान्य झाली असून सहकारातून गोरगरिबांची खरी प्रगती झाली आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्यातील दूध संघ व इतर सहकारी संस्था या राज्यातील व देशातील सहकार्यासाठी मार्गदर्शक ठरणाऱ्या असून संगमनेरचा सहकार पॅटर्न हा सर्वत्र अनुकरणीय असल्याचे गौरवोद्गार सहकारी संस्थेचे विभागीय उपनिबंधक चंद्रशेखर बारी यांनी काढले असून संगमनेर तालुका दूध संघामुळे शेतकऱ्यांना वर्षाला सुमारे 550 कोटी रुपये मिळत असल्याचे चेअरमन रणजीतसिंह देशमुख यांनी म्हटले आहे.

विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था ( दुग्ध )नाशिक,सहाय्यक निबंधक सहकारी संस्था अहिल्यानगर आणि संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष 2025 निमित्ताने सहकार दिंडी व सहकार परिसंवादात ते बोलत होते.

यावेळी अध्यक्षस्थानी चेअरमन रणजीतसिंह देशमुख हे होते तर व्यासपीठावर मा. आमदार डॉ.सुधीर तांबे, पांडुरंग पा घुले, शंकरराव खेमनर, सुधाकर जोशी, संपतराव डोंगरे,आर.बी राहणे, विलास वरपे, संतोष मांडेकर, विलास कवडे,गोरख नवले,मारुती कवडे, विक्रम राजे थोरात, बापूसाहेब गिरी,प्रा.बाबा खरात, शेखर जाधव,माजी दूध विकास अधिकारी भांगरे साहेब, कार्यकारी संचालक डॉ.सुजित खिलारी, फायनान्स मॅनेजर जीएस शिंदे, शिवाजी खुळे विविध पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी राजहंस दूध संघ ते सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांचे स्मृतिस्थळ व अमृतवाहिनी बँक यादरम्यान सहकारातील कार्यकर्ते पदाधिकारी यांनी भव्य सहकार दिंडी काढली. यावेळी स्वातंत्र्यसेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांना अभिवादन केल्यानंतर या दिंडीमध्ये बोलताना मा.आमदार डॉ.तांबे म्हणाले की, माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरचा सहकार हा दिशादर्शक आहे. सहकारांमध्ये भाऊसाहेब थोरात यांनी रुजवलेली तत्वे ही आदर्शवत असून देशाने ती अनुकरली पाहिजे.सहकार टिकला तर शेतकरी टिकणार आहे. सहकाराने ग्रामीण भागात समृद्धी आणली असून माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यांमध्ये सहकार अधिक समृद्ध करण्यासाठी शासनाने काम करावे असे आवाहन त्यांनी केले.

तर चंद्रशेखर बारी म्हणाले की, युनोने सहकाराची दखल घेतली असून हे वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून आपण साजरे करत आहोत. जगामध्ये भारत हा दूध उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचा असून अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 40 लाख लिटर दूध निर्मिती होते. सहकारामध्ये युवकांना मोठी संधी असून सहकारातील संस्थांनी मार्केटिंग बरोबरच सेवा वाढवल्याने सहकाराकडे जास्तीत जास्त नागरिक आकर्षित होणार आहे.समृद्धतेची ही सहकार चळवळ अधिक बळकट करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करावे असे आवाहन त्यांनी केले.

तर रणजीतसिंह देशमुख म्हणाले की, संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघाने 1500 लिटर दूध संकलनापासून सुरुवात केली असून आज सुमारे 4 लाख लिटर दूध संकलन केले जात आहे. तालुक्यामध्ये 200 डेऱ्या कार्यरत असून सुमारे 550 कोटींची उलाढाल होत आहे. दरमहा साधारण पन्नास कोटी रुपये दूध उत्पादनातून तालुक्यात येत असून यामुळे शेतकऱ्यांना 600 कोटी वार्षिक मिळत आहे. माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संघाने शेतकऱ्यांना आर्थिक समृद्ध केले असून आगामी काळामध्ये खाजगीकरणाची मोठी स्पर्धा आहे. याचबरोबर सहकार चळवळीचे महत्त्व युवकांना समजावून त्यांना बरोबर घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले असून सहकारात नेतृत्व चांगले असले तर सहकार चांगला राहतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे संगमनेर तालुका असून ही सहकाराची पंढरी राज्यासाठी दिशादर्शक ठरणारी असल्याचे ते म्हणाले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक डॉ.सुजित खिलारे यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ व सुरेश जोंधळे यांनी केले तर विलास कवडे यांनी आभार मानले. यावेळी दूध उत्पादक, शेतकरी, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राजहंस दूध संघाच्या वतीने भव्य सहकार दिंडी

सहकाराचे महत्व, आणि सहकारातून झालेल्या ग्रामीण विकास, प्रत्येक कुटुंबाची प्रगती आणि सहकाराची गरज याबाबत अधिक जनजागृती व्हावी याकरता आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त राजहंस दूध संघाच्या वतीने कारखाना परिसरात भव्य सहकार दिंडी आयोजित करण्यात आली. विना सहकार, नाही उद्धार या घोषणांनी अमृत उद्योग समूह दणाणून गेला. या सहकार दिंडीमध्ये मा.आमदार डॉ.सुधीर तांबे,चंद्रशेखर बारी, रणजीतसिंह देशमुख यांच्यासह अमृत उद्योग समूहातील विविध पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!