अकोले(जनता आवाज वृत्तसेवा) :- अकोले तालुक्यातील पांगरी येथे विहीर खोदकामासाठी करण्यात आलेल्या जिलेटिन स्फोटात उडालेला दगड डोक्यात पडल्याने एका कामगाराचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल, शनिवारी दुपारी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून ब्लास्टिंगच्या सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
मृत कामगाराचे नाव नितीन धोंडीराव थोरात (वय ३७, रा. रांजणगाव, ता. कोपरगाव) असे आहे. पांगरी शिवारातील त्र्यंबक दगडू काळे यांच्या शेतात विहीर खोदण्याचे काम राहुरी तालुक्यातील आढाव नावाच्या ठेकेदाराकडे देण्यात आले होते. एलआर फोकलन मशीनच्या सहाय्याने मागील आठ दिवसांपासून खोदकाम सुरू होते.
शनिवारी दुपारी सुमारे दोन ते अडीच वाजण्याच्या दरम्यान ब्लास्टिंग करण्यात आले. स्फोटाच्या दणक्याने दूरवर थांबलेल्या नितीन थोरात यांच्या डोक्यात मोठा दगड येऊन पडला. गंभीर दुखापत झाल्याने ते रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. त्यांना तातडीने कोतुळ ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच अकोले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पुढील तपास सुरू आहे.
नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
दरम्यान, अकोले तालुक्यात स्टोन क्रेशर, दगड खाणी, गौण खनिज उत्खनन तसेच विहिरींच्या कामांसाठी लागणाऱ्या जिलेटिन स्फोटकांचे मोठ्या प्रमाणात साठे विविध ठिकाणी बेकायदेशीररीत्या ठेवले जात असल्याची चर्चा आहे. नियमांचे पालन न करता दिवसरात्र स्फोट घडवले जात असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
काही दिवसांपूर्वी आंभोळ परिसरात झालेल्या अशाच स्फोटात जवळील शेतकऱ्याच्या घराच्या पत्र्यांचे नुकसान झाले होते. त्यामुळे प्रशासनाने वेळीच कडक कारवाई न केल्यास मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.




Total Users : 612016