नेवासा(जनता आवाज वृत्तसेवा):-नेवासा तालुक्यात रात्रभर झालेल्या मुसळधार व संततधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. गोदावरी, मुळा आणि प्रवरा नद्यांना आलेल्या प्रचंड पुरामुळे संपूर्ण तालुक्यात हाहाकार माजला आहे. या आपत्तीत तीन जणांचा मृत्यू झाला असून शेतकरी, व्यापारी व जनावरांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाने युद्धपातळीवर मदत व बचावकार्य सुरू केले आहे.
धरणसाठ्यातून मोठ्या प्रमाणात विसर्ग झाल्याने नद्यांची पाणीपातळी झपाट्याने वाढली आहे. गोदावरीतून ७९,५४१ क्यूसेक, मुळेतून २५,००० क्यूसेक आणि प्रवरेतून २४,५०० क्यूसेक पाणी सोडण्यात आले. परिणामी पाचेगाव, पुनतगाव व मधमेश्वर (नेवासा) बंधारे पाण्याखाली गेले आहेत. सोनईची कौतुकी नदी पात्र सोडून थेट बाजारपेठेत घुसल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शहरालगतचे दगडी फुल ओढा, काझी नाला, खोपटीचा लेंडगा नाला यांसह सर्व ओढे–नाले तुडुंब भरून वाहत आहेत.पूरस्थितीमुळे १४२ कुटुंबांतील ६५९ व्यक्तींना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आले असून, त्यांच्यासाठी १९ निवारा केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.
तालुक्यात मानवी जीवितहानीची नोंद झाली असून चिलेखनवाडी येथे पिराजी भीमराव पिटेकर (८०) यांचा भिंत अंगावर पडून मृत्यू झाला. नेवासा खुर्द येथे शकील रफिक शेख यांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला तर जैनपूर येथे संकेत भाऊसाहेब पंढरी यांचाही मृत्यू झाला. भानस हिवरा येथे लक्ष्मीबाई भास्कर साळुंखे (७१) व मयूर शाम साळुंखे (२३) हे भिंत कोसळल्याने जखमी झाले आहेत.
जनावरांचेही मोठे नुकसान झाले असून ५ गायी व १० शेळ्या पूर पाण्यात व ढासळलेल्या भिंतीखाली अडकून मृत्यूमुखी पडल्या.
शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका बसला असून कपाशी व सोयाबीन पिके पाण्याखाली गेल्याने हाती आलेला घास हिरावून गेला आहे. शेतकरी वर्ग हवालदिल झाला असून उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.



