श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा):- श्रीरामपूर नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पूर्ण ताकदीनिशी झंझावाती तयारीला सुरुवात केली आहे. आगामी निवडणुकीत नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदे देखील राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या माध्यमातून जोरदारपणे लढविणार असल्याची माहिती पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अरुण पाटील नाईक, प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुनील थोरात, तालुका अध्यक्ष कैलास बोर्डे, जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण काळे, अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष साजिद मिर्झा आणि शहराध्यक्ष अर्चनाताई पानसरे यांनी दिली.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात सांगितले आहे की, मागील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व महायुतीच्या माध्यमातून अनुराधाताई आदिक यांनी नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवून भारी मताधिक्याने विजय मिळवला होता. त्यांच्या कार्यकाळात झालेल्या उत्कृष्ट विकासकामांमुळे आजही श्रीरामपूरकरांच्या मनात त्या प्रथम पसंतीच्या उमेदवार आहेत.
राज्यात सध्या महायुतीचे सरकार असून, शासनाच्या माध्यमातून होत असलेली प्रगती आणि जनतेचा विश्वास लक्षात घेता, या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीसोबतच पुन्हा एकदा दमदारपणे मैदानात उतरणार आहे. नगराध्यक्ष पदासाठी माजी नगराध्यक्ष अनुराधाताई आदिक यांनाच राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात येणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
महायुतीतील घटक पक्षांसोबत जागावाटपाबाबत चर्चा सुरू असून, लवकरच त्याचा अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश आदिक यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची अधिकृत भूमिका उद्या सायंकाळी पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात येणार आहे.
दरम्यान, श्रीरामपूरमध्ये पसरत असलेल्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नागरिकांना केले आहे.
महायुतीच्या फॉर्मुल्यानुसार नगर परिषदेमध्ये ज्या पक्षाचा नगराध्यक्ष असेल त्या पक्षाचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार असणार आहे. त्यामुळे श्रीरामपूर नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या(AP) अनुराधाताई आदिक नगराध्यक्ष असल्याने नैसर्गिक रित्या महायुतीची उमेदवारी त्यांनाच मिळणार असल्याचा दावा पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.



