पारनेर (जनता आवाज वृत्तसेवा): – सोमवार दिनांक १० रोजी विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते पारनेर तालुक्यातील निघोज येथे सकाळी ११ वाजता महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमांतर्गत कुकडी डावा कालवा १ ते ६० कि.मी. च्या ८२ कोटी ८३ लाख रुपये अंदाजपत्रक असलेल्या विशेष दुरुस्ती करण्याच्या कामाचा भुमिपूजन सोहळा पार पडणार असल्याची माहिती आ. काशिनाथ दाते यांनी दिली.
या सोहळ्याला माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील, जुन्नर विधानसभा मतदारसंघाचे आ. शरद सोनवणे, श्रीगोंद्याचे आमदार विक्रम पाचपूते उपस्थित राहणार असून या भुमिपूजन समारंभानंतर त्याच ठिकाणी महायुतीचा भव्य मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा आयोजित होत असून, उपस्थित मान्यवर मतदारसंघातील जनतेशी व महायुतीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत विकासाच्या दिशा आणि भविष्यकालीन योजना यावर चर्चा करणार असल्याचे बोलले जात आहे.
त्यानंतर सायंकाळी ५ वाजता जवळा येथे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत अवादा कंपनीच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या ३ मेगावॅट क्षमतेच्या व जवळ जवळ ८०० शेतीपंपाना एकाचवेळी वीजपुरवठा करण्याची क्षमता असलेल्या सौर उर्जा प्रकल्पाचे भुमिपुजनही करण्यात येणार असल्याचे आ . दाते यांनी स्पष्ट करत तालुक्यातील महायुतीच्या घटकपक्षांतील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, समर्थक व निघोज- जवळा परिसरातील स्थानिक नागरिकांना याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
या विकासकामांच्या माध्यमातून निघोज व जवळा परिसरातील कृषी क्षेत्राच्या सिंचन क्षमतेत वाढ होऊन शेतकऱ्यांना थेट लाभ मिळणार असून महायुती सरकारच्या माध्यमातून तालुक्यातील कृषी क्षेत्राच्या विकासाला नवे बळ मिळेल, असा विश्वासही आ . दाते यांनी यावेळी व्यक्त केला आहे.



