संगमनेर (जनता आवाज वृत्तसेवा):- संगमनेर विधानसभेचे आमदार अमोल खताळ यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे संगमनेरच्या विकासाला एक नवी दिशा मिळाली. जिल्हा परिषदे च्या माध्यमातून दलित वस्ती सुधार योजनेच्या अंतर्गत तालुक्यातील विविध विकासकामांसाठी तब्बल ४ कोटी ७३ लाख रुपयांचा विक्रमी निधी मंजूर करण्यात आला असून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समाज कल्याण विभागाने तालुक्यातील ८१ कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे.
आमदार अमोल खताळ यांचा एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच त्यांच्या माध्यमातून विकासासाठी शासनाने शेकडो कोटी रुपयांचा निधी दिला आहे, त्यात आता आणखी निधीची भर पडली आहे. आ. खताळ यांनी नागरिकांच्या मूलभूत गरजा लक्षात घेऊन सातत्याने पाठपुरावा करून कामे मंजूर करून घेतली. ग्रामीण भागातील वस्त्यांवरील कामांना प्राधान्य देत, दलित वस्ती सुधार योजनेतून मोठा निधी खेचून आणला आहे.
आमदार खताळ यांच्या प्रयत्नांमुळे दलित वस्तीवरील नागरिकांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्यांची दुरवस्था, पाणी निचऱ्याची समस्या आणि सार्वजनिक सोयीसुविधांचे प्रश्न मोठ्या प्रमाणावर सुटणार आहेत. तालुक्यातील विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आ. अमोल खताळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले आहेत.
दरम्यान मंजूर ४ कोटी ७३ लाख रुपयांच्या निधीतून दलित वस्तीवर बंदिस्त गटारे, वीज पुरवठा, पाणी पुरवठा, रस्ता काँक्रिटीकरण, आरो प्लांट, पेव्हर ब्लॉक बसविणे, समाजमंदिर बांधकाम व दुरुस्ती करणे अशी कामे केली जाणार आहेत. या कामांमुळे पायाभूत सुविधा निर्माण होणार असून नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल होणार आहे. विकासाचे हे काम प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचावे, या हेतूने आमदार खताळ यांनी स्थानिक ग्रामपंचायतींशी समन्वय साधून नियोजनबद्ध अंमलबजावणीवर भर दिला आहे.
“तालुक्यातील विकासाला चालना देण्यासाठी सर्व स्तरांवर प्रयत्न केला जात आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विकासकामांसाठी निधी उपलब्ध होत असून त्यातून नागरिकांसाठी सोईसुविधा देणारी दर्जेदार कामे केली जात आहेत. दलित वस्ती सुधार योजनेतून मिळालेला ४ कोटी ७३ लाखांचा निधी हा सामाजिक समता आणि सर्वसमावेशक विकासासाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. वंचित घटकांच्या वस्त्यांमध्ये रस्ते, पाणी, स्वच्छता आणि सार्वजनिक सोयीसुविधांची कामे करून त्यांच्या जीवनमानात खरा बदल घडवण्याचा आमचा निर्धार आहे.”
– आ. अमोल खताळ ( आमदार संगमनेर विधानसभा)



