अहिल्यानगर (जनता आवाज वृत्तसेवा):- अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध दारू विक्री तसेच जुगार व ऑनलाइन बिंगो प्रकारावर स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांनी एक आठवडाभरात व्यापक कारवाई करत २९ गुन्हे दाखल केले असून २ लाख ८६ हजार ७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पाच विशेष पथके तयार करण्यात आली होती. या पथकांनी २४ ते ३० जानेवारी २०२६ या कालावधीत जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत छापे टाकून कारवाई केली.
अवैध दारू विक्रीवर १९ कारवाया
शेवगाव, पारनेर, सोनई, नेवासा, लोणी, राहुरी, श्रीरामपूर तालुका, अकोले, एमआयडीसी, बेलवंडी व सुपा या भागांत अवैध देशी–विदेशी तसेच गावठी हातभट्टी दारू विक्री करणाऱ्यांविरोधात १९ ठिकाणी छापे टाकण्यात आले. या कारवाईत २ लाख २४ हजार १५० रुपयांची दारू जप्त करण्यात आली असून संबंधित पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
जुगार व ऑनलाइन बिंगोवर १० कारवाया
तोफखाना, राहुरी, नेवासा, श्रीरामपूर तालुका, अकोले, कोतवाली, कोपरगाव शहर व अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अवैध जुगार व ऑनलाइन बिंगो खेळणाऱ्यांविरोधात १० ठिकाणी छापे टाकण्यात आले. या कारवाईत ६१ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मोहीम पुढेही सुरूच
अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर यापुढेही सातत्याने आणि कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेने स्पष्ट केले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली केली.



