तेलकुडगाव(जनता आवाज वृत्तसेवा ):- त्रिमूर्ती ग्रामीण मुलींचे शिक्षणशास्त्र महाविद्यालय, त्रिमूर्तीनगर (ता. नेवासा) येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत राष्ट्रीय सेवा योजना (NSS) अंतर्गत “छत्रपती संभाजी महाराजांची जीवनगाथा” या विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रम तेलकुडगाव येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. संध्या भंगाळे होत्या. यावेळी कार्यक्रम अधिकारी प्रा. सारिका नागरे, प्रा. स्मिता गिरी, प्रा. भास्कर पालवे आदी मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या प्रबोधनासाठी व्याख्याते म्हणून प्रा. निकिता बर्गे यांनी उपस्थितांना प्रभावी मार्गदर्शन केले.
प्रा. निकिता बर्गे यांनी आपल्या प्रेरणादायी व्याख्यानातून छत्रपती संभाजी महाराजांचे बालपण, त्यांचे उच्च शिक्षण, स्वराज्यासाठी दिलेले अमूल्य योगदान, अद्वितीय पराक्रम, धर्मनिष्ठा आणि अखेरचे बलिदान यांचा सखोल आढावा घेतला. संभाजी महाराजांचे जीवन हे शौर्य, त्याग, निष्ठा आणि स्वाभिमानाचे जिवंत प्रतीक असून आजच्या तरुण पिढीसाठी ते अत्यंत प्रेरणादायी आहे, असे त्यांनी ठामपणे मांडले.
त्यांच्या ओघवत्या व विचारप्रवर्तक भाषणामुळे उपस्थित श्रोते मंत्रमुग्ध झाले. कार्यक्रमाच्या शेवटी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या मार्गदर्शनपर कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाविषयीची जाणीव अधिक दृढ झाली असून देशभक्तीची भावना जागृत झाल्याचे स्पष्टपणे दिसून आले.
संपूर्ण कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला असून उपस्थित मान्यवरांनी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले.



