spot_img
spot_img

ॲट्रॉसिटीची धमकी देत खंडणी मागितली; महिलेविरुद्ध गुन्हा 

श्रीरामपूर(जनता आवाज वृत्तसेवा):- बेलापूर येथील न्याती समता इंटरनॅशनल स्कूलचे माजी सचिव राकेश अनिल न्याती यांनी एका महिलेविरुद्ध ॲट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत मोठ्या रकमेची खंडणी मागितल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे.

राकेश न्याती (वय ४३, रा. मोरगे वस्ती, श्रीरामपूर) हे सन २०१८ पासून न्याती समता इंटरनॅशनल स्कूल, बेलापूर येथे सचिव म्हणून कार्यरत होते. मात्र १ एप्रिल २०२५ रोजी शाळेचे संपूर्ण व्यवस्थापन अधिकृत करारानुसार श्री चैतन्य टेक्नो स्कूल, हैद्राबाद यांना भाडेतत्त्वावर देण्यात आले असून त्यानंतर शाळेच्या प्रशासन किंवा आर्थिक व्यवहारांशी आपला कोणताही संबंध नसल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

शाळेत गार्डन कामासाठी कार्यरत असलेले दिवंगत प्रल्हाद राधाकिसन फुलपगार हे आजारपणामुळे ३१ जुलै २०२५ पासून कामावर येणे बंद झाले. त्यानंतर त्यांच्या पत्नी सुरेखा प्रल्हाद फुलपगार या वेळोवेळी शाळेत व कार्यालयात येऊन “तुमच्यामुळे माझे पती आजारी पडले,” असा आरोप करत पैशांची मागणी करू लागल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

मानसिक दबाव व बदनामीच्या भीतीपोटी २३ सप्टेंबर २०२५ रोजी प्रल्हाद फुलपगार यांच्या बँक खात्यात ५० हजार रुपये एनईएफटीद्वारे जमा केल्याचे न्याती यांनी नमूद केले आहे. मात्र नोव्हेंबर २०२५ मध्ये प्रल्हाद फुलपगार यांचे निधन झाल्यानंतरही हा त्रास सुरूच राहिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

१३ डिसेंबर २०२५ रोजी सुरेखा फुलपगार या शाळेत येऊन कर्मचाऱ्यांशी वाद घालत असल्याची माहिती मिळाल्यानंतर राकेश न्याती यांनी तेथे धाव घेतली. यावेळी सुरेखा फुलपगार यांनी २० लाख रुपयांची मागणी करत, रक्कम न दिल्यास ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

१५ ऑगस्ट २०२५ पासून आजतागायत वेळोवेळी फोन करून तसेच प्रत्यक्ष भेटून खंडणीची मागणी केली जात असल्याने आपण व कुटुंबीय मानसिक तणावाखाली असल्याचे न्याती यांनी तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित महिलेविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी पोलिसांकडे केली आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!