घोडेगाव (जनता आवाज वृत्तसेवा) :- नेवासा तालुक्यातील घोडेगाव परिसरात कत्तलीसाठी नेण्यात येत असलेल्या १३ गोवंशीय जनावरांची स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांनी धडक कारवाई करत सुटका केली. या कारवाईत चौघा आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून तब्बल ३९ लाख १० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात गोवंशीय जनावरांची बेकायदेशीर कत्तल रोखण्यासाठी कठोर कारवाईचे आदेश पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिले होते. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले.
दि.३ फेब्रुवारी रोजी पहाटे, गुप्त बातमीदारामार्फत कृष्णानगर, घोडेगाव येथे काही इसम गोवंशीय जनावरे ट्रकमध्ये भरून कत्तलीसाठी नेत असल्याची माहिती मिळाली. माहितीच्या आधारे पथकाने तात्काळ कारवाई करत घटनास्थळी छापा टाकला. यावेळी काही इसम मातीच्या ढिगाऱ्यावरून जनावरे ट्रकमध्ये चढवत असल्याचे आढळून आले.
पोलिसांनी घटनास्थळीच चार जणांना ताब्यात घेतले. त्यांची नावे रशिद जानुभाई शेख (६५), अमीन इसाक सय्यद (३०), लाला उर्फ आफताब हारुन शेख (२६) आणि शुभम बाबासाहेब पुंड (२६) अशी आहेत.
आरोपींकडून ९ लाख १० हजार रुपये किमतीची १३ गोवंशीय जनावरे तसेच ३० लाख रुपये किमतीचा टाटा कंपनीचा ट्रक (MH-46-AR-6385) असा एकूण ३९ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ३२/२०२६ अन्वये महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम १९९५ (सुधारित २०१५) चे कलम ५(अ), ५(ब), ९ तसेच प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियमाचे कलम ३ व ११ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सोनई पोलीस ठाणे करत आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी व अंमलदारांनी यशस्वीरीत्या पार पाडली.




Total Users : 612258