पारनेर (जनता आवाज वृत्तसेवा):- आज पारनेर तालुक्यातील अहिल्यानगर-पुणे महामार्गावरील सुपा औद्योगिक क्षेत्रातील तौरल इंडिया या प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पार पडला आहे . या प्रकल्पामुळे जिल्ह्यातील युवकांना मोठा रोजगार उपलब्ध होणार आहे.
अनेक दिवसापासून औद्योगिक क्षेत्रात झुंडशाही व गुंडशाही खपवून घेतली जाणार नाही. सुपा औद्योगिक क्षेत्राची वेगाने वाढ होत असताना काही घटक उद्योजकांना त्रास देण्याचे प्रकार करत असल्याची माहिती मिळाली आहे. हे अजिबात सहन केले जाणार नाही. अशा घटकांना ठोकून काढले जाईल, असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. मात्र, ठोकून काढणे म्हणजे कायद्याच्या चौकटीतच कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, नागरिकांना उद्योगांकडून काही अडचणी असतील तर त्यांनी अधिकृत यंत्रणेकडे तक्रार करावी. मात्र, उद्योगांना दिला जाणारा बेकायदेशीर त्रास खपवून घेतला जाणार नाही. सुपा औद्योगिक क्षेत्रात नवीन उद्योग येत असताना येथे काही वाईट ‘उद्योग’ ही निर्माण होत असल्याची माहिती आहे. अशा घटनांकडे कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत गांभीर्याने पाहिले जाईल. जिल्हा पोलीस अधीक्षकांना याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. ‘इज ऑफ डुइंग बिझनेस’, उत्पादन खर्चातील सुलभता आणि मजबूत कायदा-सुव्यवस्थेमुळे महाराष्ट्रात उद्योगवाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर औद्योगिक क्षेत्रातील अगदी लहान घटनाही गंभीर मानून त्यावर तातडीने कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
महाराष्ट्रात उद्योगवाढ होत असताना पर्यावरणाचे संरक्षणही तितकेच महत्त्वाचे आहे. उद्योग पर्यावरणपूरक असले पाहिजेत. उद्योगवाढ आणि पर्यावरण यांचा समतोल साधणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. यापूर्वी उद्योगवाढ प्रामुख्याने मुंबई-पुणे पट्ट्यात मर्यादित होती. आता उद्योगांचे विकेंद्रीकरण सुरू करण्यात आले असून राज्याच्या प्रत्येक भागात उद्योग पोहोचविण्याचा प्रयत्न आहे. मेक इन इंडियाच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करण्याचा सरकारचा प्रयत्न असून उत्पादन क्षेत्र अर्थव्यवस्थेचा कणा ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, आ. काशिनाथ दाते, आ. विक्रम पाचपुते, महंत नामदेव शास्त्री, महंत शिवाजी महाराज, तौरल इंडियाचे प्रमुख भरत गिते आदी उपस्थित होते.



