श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा):-श्रीरामपूर-नेवासा रोडवरील ओव्हरब्रीजवर, शुक्रवारी (दि. १० जुलै) रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास एसटी बस आणि मारुती सुझुकी ८०० कार चारचाकी वाहनात भीषण अपघात झाला. या अपघातात कारचालक गंभीर जखमी झाले असून, कारचे मोठे नुकसान झाले आहे. ओव्हरब्रीजच्या अरुंद रचनेमुळे हा अपघात झाला असून, हा पूल आता वाहनधारकांसाठी ‘डेथ ट्रॅप’ ठरत असल्याचा संताप नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिर्डीवरून वर्ध्याच्या दिशेने निघालेली एसटी बस आणि मारुती सुझुकी ८०० कार (क्रमांक एम एच १७ एन १३९५) यांची ओव्हरब्रीजवर समोरासमोर जोरदार धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये कारचा पुढचा भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. अपघातात कारचालक जावेद शेख (मेडिकल चालक, रा. वार्ड नं. १) हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हा अपघात सकाळी ९ वाजेच्या सुमारास झाला. हा वेळ नोकरदार, व्यावसायिक आणि प्रवाशांच्या वर्दळीचा असल्याने ओव्हरब्रीजच्या दोन्ही बाजूंनी मोठी वाहतूक कोंडी झाली होती. घटनेची माहिती मिळताच श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जखमी जावेद शेख यांना तात्काळ रुग्णालयात हलविण्यात आले. क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करून विस्कळीत झालेली वाहतूक पूर्ववत सुरळीत केली. या घटनेचा पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करत आहेत.
“या ओव्हरब्रीजवर वारंवार होणारे अपघात रोखण्यासाठी प्रशासनाने या अरुंद पुलाचे व रस्त्याचे तातडीने रुंदीकरण करावे. तसेच, या ठिकाणी रात्रीच्या वेळी पुरेशी प्रकाश व्यवस्था लाईट करावी आणि वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी गतिरोधक व सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत,” अशी तीव्र मागणी वडाळा महादेव, शिरसगाव आणि परिसरातील ग्रामस्थांमधून केली जात आहे.
ओव्हरब्रीज बनतोय ‘डेथ ट्रॅप’; रुंदीकरणाची तीव्र मागणी
या ओव्हरब्रीजवर अपघात होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही या ठिकाणी अनेक भीषण अपघात झाले असून, अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. हा ओव्हरब्रीज अत्यंत अरुंद असल्याने समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज येत नाही आणि गतिमान वाहनांमुळे अपघात घडतात.



