श्रीरामपूर(जनता आवाज वृत्तसेवा):- शाळा सुटल्यानंतर घरी निघालेल्या चिमुकल्यांवर भरधाव कारने धडक दिल्याने श्रीरामपूर तालुक्यातील ब्राह्मणगाव वेताळ–शिरसगाव मार्गावर गुरुवारी हृदयद्रावक अपघात घडला. ब्राह्मणगाव वेताळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सहा विद्यार्थी जखमी झाले असून, त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना लोणी येथील प्रवरा वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून संतापाची लाट उसळली आहे.
माळेवाडी येथील एका हायस्कूलमधील शिक्षक स्विफ्ट डिझायर कारने शिरसगावच्या दिशेने जात असताना शाळेपासून काही अंतरावर हा अपघात झाला. शाळा सुटल्याने विद्यार्थी रस्त्याने घरी जात असतानाच भरधाव कारने त्यांना जोरदार धडक दिली. धडकेनंतर विद्यार्थी रस्त्यावर फेकले गेल्याने घटनास्थळी एकच आरडाओरडा झाला.
ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी विद्यार्थ्यांना बाहेर काढून श्रीरामपूर येथील साखर कामगार रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर दोन विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांच्यासह इतर जखमी विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी लोणी येथील प्रवरा रुग्णालयात हलविण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच मार्केट कमिटीचे माजी संचालक राधाकिसन आहेर यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. जखमी विद्यार्थ्यांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी त्यांनी रुग्णवाहिका व रुग्णालयाशी समन्वय साधला.
अपघातानंतर परिसरात मोठी गर्दी झाली. अपघाताचे नेमके कारण, वाहनाचा वेग आणि चालकाची जबाबदारी याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून शाळांजवळ वाहतुकीवर कठोर नियंत्रणाची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.




Total Users : 621969