spot_img
spot_img

महापालिकेचा प्रसिद्धी विभाग ठराविकांच्या दावणीला? निवडणूक काळात सुरू झालेल्या ग्रुपवरच बातम्यांची देवाणघेवाण; १०८ पत्रकार असलेल्या जुन्या ग्रुपकडे दुर्लक्ष झाल्याची चर्चा

अहिल्यानगर( जनता आवाज वृत्तसेवा) :- महापालिका प्रशासनाच्या विविध विभागांकडून प्रसिद्ध होणाऱ्या दैनंदिन बातम्या आणि माहिती ठराविक पत्रकारांपुरतीच मर्यादित ठेवली जात असल्याची चर्चा सध्या पत्रकारांमध्ये सुरू आहे. निवडणूक काळात सुरू करण्यात आलेल्या एका स्वतंत्र ग्रुपवर महापालिकेच्या विविध विभागांची माहिती पाठविली जात असल्याचे सांगितले जाते. मात्र, या ग्रुपमध्ये मोजक्याच पत्रकारांचा सहभाग असल्याने महापालिकेच्या प्रसिद्धी व्यवस्थेच्या पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

महापालिका प्रशासनातील कर्मचाऱ्यांनी यापूर्वी पत्रकारांसाठी एक स्वतंत्र ग्रुप सुरू केला होता. या ग्रुपमध्ये तब्बल १०८ पत्रकार सहभागी असल्याचे सांगण्यात येते. दैनिक, सायंदैनिक, साप्ताहिक यांसह डिजिटल माध्यमे, युट्युब आणि वेबसाईट चालकांचाही त्यात समावेश होता. या माध्यमातून महापालिकेच्या विविध विभागांतील घडामोडी, उपक्रम, निर्णय आणि प्रशासनाशी संबंधित माहिती पत्रकारांना मिळत होती.

मात्र, निवडणुकीच्या काळात या माहितीच्या देवाणघेवाणीला ब्रेक लागल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर महापालिकेच्या विविध विभागांकडून प्रसिद्धीसाठीची माहिती एका विशिष्ट ग्रुपवरच पाठविली जात असल्याची चर्चा आहे. परिणामी, पूर्वी नियमितपणे महापालिकेच्या बातम्या मिळविणाऱ्या अनेक पत्रकारांना आता अधिकृत माहिती मिळविण्यात अडचणी येत असल्याचे बोलले जात आहे.

माहितीच्या समान संधीचा प्रश्न

प्रसिद्धी विभागाचे कामच प्रशासनाची अधिकृत माहिती माध्यमांपर्यंत पोहोचविणे आहे. त्यामुळे कोणत्या माध्यमाला माहिती द्यायची आणि कोणाला द्यायची नाही, याबाबत स्पष्ट व पारदर्शक धोरण असणे आवश्यक असल्याची भूमिका काही पत्रकारांकडून व्यक्त होत आहे. महापालिकेच्या अधिकृत बातम्या, निर्णय आणि विभागीय माहिती सर्व संबंधित माध्यमांना समान पद्धतीने उपलब्ध करून दिली गेल्यास गैरसमजाला वाव राहणार नाही. उलट, मोजक्या पत्रकारांच्या ग्रुपपुरती माहिती मर्यादित राहिल्यास इतर माध्यमांमध्ये दुजाभाव होत असल्याची भावना निर्माण होऊ शकते. विशेषतः महापालिकेच्या अधिकृत प्रसिद्धी यंत्रणेकडून माहिती प्रसारित केली जात असेल, तर त्यासाठी कोणते निकष आहेत, पत्रकारांचा समावेश कशा पद्धतीने केला जातो आणि एखाद्या ग्रुपची निवड कोणत्या निर्णयानुसार करण्यात आली, हे स्पष्ट होणे गरजेचे आहे.

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!