शिर्डी (जनता आवाज वृत्तसेवा): – साईबाबा संस्थानच्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर विखे पाटील परिवाराने सातत्याने पाठपुरावा केला आहे. मात्र, कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागत असतील, तर त्याचे श्रेय घेण्यापेक्षा त्यांना न्याय मिळणे महत्त्वाचे आहे. कर्मचाऱ्यांचे कल्याण होणे हा साईबाबांचा आशीर्वाद असून, राजकीय नेत्यांच्या कामाचे खरे मूल्यमापन जनतेच्या मतदानातूनच होते, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.
शिर्डी येथे श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडच्या वतीने दीपावलीनिमित्त आयोजित शिधावाटप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सभासद व कर्मचाऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात शिधावाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने डॉ. विखे पाटील यांनी साईबाबा संस्थानच्या कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांसह सेवाशर्ती, वेतनातील तफावत, पदोन्नती आणि विश्वस्त मंडळाच्या नियुक्तीबाबत आपली भूमिका मांडली.
डॉ. विखे पाटील म्हणाले की, मागील दिवाळीच्या कार्यक्रमाला आल्यानंतर यंदाच्या दिवाळीपर्यंत ४८८ कर्मचाऱ्यांचा प्रश्न मार्गी लागेल, अशी अपेक्षा होती. या प्रक्रियेत अनेकांनी प्रयत्न केले, संघर्ष केला आणि आपल्या योगदानाचे श्रेय घेण्याचाही प्रयत्न केला. मात्र, या कर्मचाऱ्यांचे कल्याण होणे हा साईबाबांचा आशीर्वाद आहे, अशी आपली भावना आहे. एखाद्या चांगल्या कामाचे श्रेय प्रत्येकाला घ्यावेसे वाटते,परंतु कर्मचाऱ्यांना न्याय मिळणे हेच सर्वांत महत्त्वाचे आहे.
राजकीय क्षेत्रातील श्रेयवादावर भाष्य करताना डॉ. विखे पाटील यांनी लोकशाही प्रक्रियेचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, एखाद्या कामासाठी आपण प्रयत्न केले, संघर्ष केला, त्यामुळेच ते काम पूर्ण झाले, असे प्रत्येकाला वाटू शकते. मात्र, राजकीय व्यक्तीच्या कामाचे मूल्यमापन अखेर मतदानातूनच होते. लोकप्रतिनिधींचे काम योग्य नसेल, तर मतदार त्यांना मतदानातून उत्तर देतात. त्यामुळे कोण काय बोलते किंवा कोण कोणावर आरोप करते, यापेक्षा जनतेचा कौल महत्त्वाचा आहे.
शिर्डीतील ग्रामस्थ, तालुक्यातील नागरिक, शेतकरी आणि साईबाबा संस्थानच्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर विखे पाटील परिवाराने केलेल्या कामाचे मूल्यमापन जनता करेल. कोणाच्या आरोपांमुळे आमचे राजकीय भविष्य ठरणार नाही. साईबाबांचा आशीर्वाद आणि जनतेचा विश्वास यांवरच आमची श्रद्धा आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
साईबाबा संस्थानच्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत बोलताना डॉ. विखे पाटील यांनी सेवाशर्ती, वेतनातील तफावत आणि पदोन्नती प्रक्रियेतील अडचणींकडे लक्ष वेधले. वेगवेगळ्या विश्वस्त मंडळांच्या काळात झालेल्या निर्णयांमुळे अनेक प्रश्न गुंतागुंतीचे झाले आहेत. समान शैक्षणिक पात्रता आणि समान अनुभव असूनही कर्मचाऱ्यांच्या वेतनात तफावत असणे योग्य नाही. सर्वांना समान न्याय मिळण्याच्या दृष्टीने या प्रश्नांचा गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.
कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर प्रशासनाने वेळ देऊन सविस्तर चर्चा करावी. काही प्रश्नांवर एकत्रितपणे विचारविनिमय केल्यास त्यांचे निराकरण होऊ शकते. प्रशासनावर कामाचा मोठा ताण असला, तरी कर्मचाऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने प्रलंबित प्रश्न टप्प्याटप्प्याने सोडविण्याची आवश्यकता आहे, असेही त्यांनी नमूद केले.
कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा सातत्याने वाढत असतात. सुरुवातीला नोकरी, त्यानंतर कायमस्वरूपी नियुक्ती, वेतनातील सुधारणा आणि इतर सेवासुविधा अशा विविध मागण्या पुढे येतात. जनतेच्या अपेक्षा कधी संपत नाहीत आणि सक्षम नेतृत्वानेही सर्वसामान्यांची कामे करताना थांबता कामा नये. हा जनतेशी निर्माण झालेल्या विश्वासाचा आणि ऋणानुबंधाचा भाग आहे, असे त्यांनी सांगितले.
४८८ कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर समाधान व्यक्त करतानाच या प्रक्रियेत काही कर्मचारी मागे राहिल्याची खंतही डॉ. विखे पाटील यांनी व्यक्त केली. मागील विश्वस्त मंडळाने किमान आठवी उत्तीर्ण असण्याची अट निश्चित केल्यामुळे दीर्घकाळ सेवा केलेल्या काही कर्मचाऱ्यांना या प्रक्रियेचा लाभ मिळू शकला नाही. मात्र, त्यांचे प्रश्नही मार्गी लागले पाहिजेत. कोणावरही अन्याय होऊ नये, ही आपली अपेक्षा असल्याचे ते म्हणाले.
संस्थानमधील वैद्यकीय आणि निमवैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडेही त्यांनी लक्ष वेधले. अधिक शैक्षणिक पात्रता असूनही काही कर्मचारी सेवासंधी आणि पदांच्या बाबतीत मागे राहिले आहेत. कर्मचारी भरती नियमावलीतील तरतुदी, पात्रतेच्या अटी आणि त्यांची अंमलबजावणी यांचा फेरविचार होणे आवश्यक आहे.
परिचारिका आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी लागू केलेल्या पात्रतेच्या अटींचा संदर्भ देताना ते म्हणाले की, संबंधित पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अतिरिक्त अटी यांचा तर्कसंगत मेळ असला पाहिजे. एखादा नियम ज्या तारखेपासून लागू होतो, त्याची अंमलबजावणी करताना त्या तारखेचा आणि संबंधित कर्मचाऱ्यांच्या परिस्थितीचा विचार होणे आवश्यक आहे. प्रशासनाच्या कायदेशीर मर्यादा लक्षात घेऊन कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी व्यवहार्य उपाय शोधले पाहिजे.
साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या नियुक्तीचा मुद्दाही डॉ. विखे पाटील यांनी उपस्थित केला. गेल्या चार दिवाळींपासून विश्वस्त मंडळ नियुक्त होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. विश्वस्त मंडळ अस्तित्वात आल्यानंतर संस्थानमधील अनेक प्रलंबित प्रश्नांना गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार, न्यायव्यवस्था आणि प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून संस्थानचे कामकाज सुरळीत होण्यास मदत होत असल्याचे त्यांनी नमूद केले. छत्रपती संभाजीनगर येथील उच्च न्यायालयाने प्रलंबित विषयांवर निर्णय दिल्यामुळे संस्थानच्या कामकाजाला गती मिळाल्याचे सांगत त्यांनी न्यायालयाच्या भूमिकेचे अभिनंदन केले.
कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर निर्णय घेताना प्रशासनाला नियम आणि कायदेशीर चौकटीत काम करावे लागते. मात्र, काही प्रश्न सोडविण्यासाठी धोरणात्मक निर्णयांची आवश्यकता असते. अशा वेळी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन कर्मचाऱ्यांच्या हिताचे मार्ग शोधले पाहिजेत, असेही त्यांनी सांगितले.
शिर्डी शहरातील आगामी विकासकामांची माहिती देताना डॉ. विखे पाटील यांनी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने सुमारे ५० कोटी रुपयांची कामे सुरू असल्याचे सांगितले. तसेच साईबाबा संस्थानच्या माध्यमातून थीम पार्कसाठी ३० कोटी रुपयांच्या कामाला मंजुरी मिळाल्याचा उल्लेख त्यांनी केला. या प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेसह पुढील कामांना गती मिळाल्यानंतर शिर्डीच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच शहरात स्टेडियम, नाट्यगृह आणि थीम पार्क यांसारख्या सुविधा उभारण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. पुढील वर्षभरात शिर्डीच्या विकासाचे चित्र बदललेले दिसेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शहर स्वच्छ ठेवणे, अतिक्रमणांवर नियंत्रण ठेवणे आणि गुन्हेगारीमुक्त वातावरण निर्माण करणे यासाठी नगरपरिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी व नगरसेवकांनी जबाबदारीने काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
साईबाबा संस्थानच्या कर्मचाऱ्यांना मिळणारा न्याय हा केवळ एका दिवसाचा किंवा एका कार्यक्रमाचा विषय नसून, त्यांच्या भविष्यासाठी सातत्याने काम करण्याची गरज आहे, असे डॉ. विखे पाटील यांनी स्पष्ट केले. अनेक कर्मचारी वर्षानुवर्षे आपल्या प्रश्नांच्या निराकरणाची वाट पाहत आहेत. त्यामुळे उर्वरित कर्मचाऱ्यांचे प्रश्नही संवेदनशीलतेने आणि सकारात्मक दृष्टिकोनातून सोडविण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.साईबाबांच्या आशीर्वादाने आणि जनतेच्या विश्वासाच्या बळावर कर्मचाऱ्यांच्या हितासाठी प्रयत्न सुरूच राहतील, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ गाडगीळकर, शिर्डीच्या नगराध्यक्षा जयश्री थोरात, विठ्ठलराव पवार यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी, संस्थानचे कर्मचारी आणि सोसायटीचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.




Total Users : 669909