अहिल्यानगर(जनता आवाज वृत्तसेवा):- सीजेपीचे अभिजीत दिपके यांच्या आंदोलनावरून भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
देशात राहत नसलेल्या व्यक्तींना अचानक देशाची चिंता कशी वाटू लागली, असा सवाल करत विखे यांनी दिपके यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. एवढेच नव्हे, तर या आंदोलनामागे मोठे षडयंत्र असून त्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करण्यात आल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. अहिल्यानगरमध्ये भाजपच्या वतीने आयोजित ‘लोकशाही बचाव, अराजकता हटाव’ पदयात्रेनंतर ते माध्यमांशी बोलत होते.
अहिल्यानगर शहरात भाजपच्या वतीने लोकशाही बचाव आणि अराजकता हटावचा संदेश देण्यासाठी पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या पदयात्रेत भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शहरातील दिल्ली गेट परिसरात पदयात्रेची सांगता झाल्यानंतर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी विरोधकांच्या आंदोलनांवर आणि त्यांच्या भूमिकेवर भाजप नेत्यांनी टीका केली. सभेनंतर माध्यमांशी संवाद साधताना सुजय विखे पाटील यांनी सीजेपी आणि अभिजीत दिपके यांच्यावर निशाणा साधला.
अभिजीत दिपके यांच्या आंदोलनावर बोलताना सुजय विखे पाटील म्हणाले की, जे अभिजीत दिपके गेल्या कित्येक वर्षांपासून देशातच राहत नाहीत, त्यांना अचानक देशाची काळजी कशी वाटू लागली? ज्याने आपल्या शेजाऱ्याच्या कुंपणाला हातभार लावण्यासाठी कधी मदत केली नाही, तो आज देशाला शहाणपण शिकवायला निघाला आहे, अशा शब्दांत त्यांनी दिपके यांच्यावर टीका केली.
दिपके यांच्या आंदोलनामागे केवळ लोकशाही किंवा देशहिताचा मुद्दा नसून त्यामागे मोठे षडयंत्र असल्याचा आरोपही विखे यांनी केला. या आंदोलनासाठी मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करण्यात आला असल्याचा दावा त्यांनी केला.
भाजपाच्या पदयात्रेचे आयोजन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये विधानसभेचे सभापती प्रा. राम शिंदे, आमदार अक्षय कर्डिले, मोनिका राजळे, उपमहापौर धनंजय जाधव, नगरसेवक निखिल वारे, दक्षिणेचे भाजपा अध्यक्ष दिलीप भालसिंग, उत्तरेचे भाजपा अध्यक्ष नितीन दिनकर याचबरोबर असंख्य हजारोने कार्यकर्ते जमा झाले होते.




Total Users : 685901