शिर्डी(जनता आवाज वृत्तसेवा):- मुंबई येथील एस.पी. मंडळी संचालित वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या ‘टेंपल मॅनेजमेंट’ अभ्यासक्रमाचा पदवीदान सोहळा शिर्डीत संपन्न झाला. यावेळी मंदिर व्यवस्थापनात धार्मिक परंपरांसोबतच आधुनिक व्यवस्थापनशास्त्र, आर्थिक पारदर्शकता, तंत्रज्ञान आणि सेवाभाव यांची सांगड घालणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोरक्ष गाडीलकर यांनी केले.
या कार्यक्रमास श्री साईबाबा संस्थानचे माजी अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे, एस.पी. मंडळीचे अध्यक्ष ॲड. सदानंद फडके, उपाध्यक्ष राजेंद्र पवार, एस.पी. मंडळीचे समूह सल्लागार प्रा. डॉ. उदय साळुंखे, वेलिंगकर इन्स्टिट्यूटचे संचालक प्रा. डॉ. कौस्तुभ डागलकर आणि टेंपल कनेक्टचे संस्थापक गिरीश कुलकर्णी उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री. गाडीलकर म्हणाले की, मंदिर व्यवस्थापनात धार्मिक विधी आणि दर्शन व्यवस्थेइतकेच गर्दी नियंत्रण, भाविकांची सुरक्षा, स्वच्छता, आरोग्यसेवा आणि आर्थिक व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. लाखो भाविकांचे व्यवस्थापन करताना सक्षम नियोजन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक आहे. या अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना मंदिर व्यवस्थापनाचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा, यासाठी श्री साईबाबा संस्थानच्या माध्यमातून इंटर्नशिपची संधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी संस्थानच्या विविध सेवाभावी उपक्रमांची माहिती दिली.
ॲड. सदानंद फडके यांनी मंदिर व्यवस्थापनात समर्पण, सेवाभाव आणि आर्थिक पारदर्शकतेचे महत्त्व अधोरेखित केले. डॉ. सुरेश हावरे यांनी मंदिरांमुळे पर्यटन, वाहतूक, निवास आणि स्थानिक व्यापारासह विविध क्षेत्रांत निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या संधींची माहिती दिली.
प्रा. डॉ. उदय साळुंखे यांनी अभ्यासक्रमाची माहिती देताना पहिल्या तुकडीत १८ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतल्याचे सांगितले. तीन महिन्यांच्या प्रत्यक्ष प्रशिक्षणासह विद्यार्थ्यांनी शिर्डी, शेगाव, सोलापूर आणि तुळजापूरसह विविध मंदिरांच्या व्यवस्थापनाचा अभ्यास केला.
यावेळी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एअर मार्शल (निवृत्त) जितेंद्र मिश्रा यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे शुभेच्छा दिल्या. शिर्डी संस्थानची व्यवस्थापन पद्धती, भाविकांसाठीच्या सुविधा आणि देणगी व्यवस्थापन अन्य धार्मिक संस्थांसाठीही मार्गदर्शक ठरू शकते, असे त्यांनी नमूद केले.
यावेळी श्री साईबाबा संस्थानचे प्र. उप मुख्य कार्यकारी अधिकारी संदीपकुमार भोसले, मुख्य लेखाधिकारी मंगला वराडे, वेलिंगकर इन्स्टिट्यूटचे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.




Total Users : 686917