spot_img
spot_img

जो कारखाना जास्त दर देईल त्याला ऊस द्यावा  – अनिल घनवट

लिंपणगाव(जनता आवाज वृत्तसेवा):- अहिल्यानगर जिल्ह्यातील साखर कारखानदार व शेतकरी संघटनेच्या नेत्यांच्या झालेल्या बैठकीतील निर्णय योग्य नसून जो कारखाना जास्त दर देईल त्याला शेतकऱ्यांनी ऊस द्यावा असे आवाहन शेतकरी संघटनेचे नेते अनिल घनवट यांनी प्रसिद्धीस दिली आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील ऊस उत्पादकांना पहिला हप्ता किती मिळावा यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. सुरुवातीला बैठकीला फक्त राजू शेट्टी व त्यांच्या निवडक कार्यकर्त्यांनाच बैठकीत प्रवेश देण्यात आला होता. प्रवेश नाकारल्यावर अनिल घनवट यांनी जिल्हाधिकारी दालना समोर घोषणाबाजी केली व एकाच संघटनेच्या नेत्यांना बैठकीत प्रवेश दिल्याबद्दल आक्षेप घेतला तेव्हा त्यांना व भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या नेत्याला बैठकीत प्रवेश देण्यात आला.

पहिल्या फेरीत साखर कारखानदारांच्यावतीने पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी ३१००/- रू पहिला हप्ता देण्याची तयारी दर्शवली. हे मान्य नसल्यामुळे पुन्हा साखर कारखानदारांनी आपसात चर्चा करून पुन्हा बैठकीस बोलावले. या बैठकीला शेतकरी संघटनांच्या वतीने फक्त राजू शेट्टी, अनिल घनवट व रवी मोरे होते. या वेळी पालक मंत्र्यांनी ३२५० पहिला हप्ता, १०० रु कारखाना बंद होताना व १०० रु पुढच्या (२०२७) च्या डिसेंबर मध्ये देण्याचे जाहीर केले. अनिल घनवट यांनी या प्रस्तावाला विरोध केला व पहिला हप्ता किमान ३५००/- प्रतिटन असावा असा आग्रह धरला मात्र राजू शेट्टी यांच्या कडून त्यास साथ मिळाली नाही. तसेच कारखान्याचे साखर वर्ष हे सप्टेंबर मध्ये संपते तेव्हा शेवटचा हप्ता द्यावा अशी मागणी केली तेव्हा दिवाळी पूर्वी देण्याचे कबूल करण्यात आले.

जाहीर झालेला ३२५०/- रु हा किमान पहिला हप्ता सर्व कारखान्यांनी द्यायचा आहे व ज्या साखर कारखान्यांची ऐपत आहे त्यांनी जास्त दर दिला तरी चाले असे जाहीर करण्यास सांगितले.

साखरेला चांगले दर असल्यामुळे शिखर सहकारी बँकेने साखरेचे मूल्यांकन ४५००/- प्रति क्विंटल केले आहे व प्रत्यक्ष साखर ५२००/- रु प्रति क्विंटल विकत आहे त्यामुळे साखर कारखान्यांना ३५००/- ते ३७०० /- पहिला हप्ता देण्यास अडचण नव्हती. अहिल्या नगर जिल्ह्यातील व शेजारच्या पुणे जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांनी ३७००/- रु दर जाहीर केला आहे. ऊस उत्पादकांनी, जो साखर कारखाना जास्त दर देईल त्याला ऊस द्यावा असे आवाहन घनवट यांनी केले.

साखरेला या वर्षी उच्चांकी दर मिळण्याची शक्यता आहे. त्याचा फायदा ऊस उत्पादकांना मिळाला पाहिजे. ३४५०/- हा अंतिम दर देऊन साखर कारखानदार शेतकऱ्यांना फसवण्याचा शक्यता आहे. रंगराजन समितीच्या शिफारशी प्रमाणे ७०-३० अशी नफ्याची वाटणी व्हायला हवी. पहिला हप्ता कमी मिळाला तरी चालेल पण शेवटचा हप्ता साखर व उपदार्थांच्या विक्री दरा नुसार मिळविण्यासाठी, शेतकऱ्यांनी पुन्हा आंदोलनाची तयारी ठेवावी असे आवाहन शेतकरी नेते व स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!