टाकळीभान( जनता आवाज वृत्तसेवा):- श्रीरामपूर तालूक्यातील टाकळीभानसह परिसराला वरदान ठरलेल्या टाकळीभान टेलटँकमधून शेतकर्यांसाठी ठिबक सिंचन योजना राबविण्याचा मानस राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस अविनाश आदिक यांनी व्यक्त केला असून टाकळीभान येथे या बाबत रविवार दिनांक ६/८/२०२४ रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले असून या बैठकीस शेतकर्यांनी उपस्थित राहावे असेआवाहन करण्यात आले आहे.
टाकळीभानसह परिसराला वरदान ठरलेल्या टाकळीभान टेलटँकमधून शेतकर्यांसाठी ठिबक सिंचन योजना राबविण्याचा मानस – अविनाश आदिक
माजी मंत्री स्व. गोविंदराव आदिक यांनी तालुक्यात व राज्यात मिळालेल्या सत्तेच्या माध्यमातून श्रीरामपुर मतदार संघाचा सर्वांगिन विकासाचा प्रयत्न केला. अनेक महत्वकांक्षी योजना मार्गी लावल्या आहेत.१९७२ ला श्रीरामपुर विधानसभा मतदार संघातुन प्रथम आमदार झाल्यावर त्या वर्षी पडलेल्या भीषण दुष्काळाचा सामना करण्यासाठी नागरीकांच्या हाताला काम देण्याकरीता टाकळीभान टेलटँकची निर्मिती सुरु केलेली होती व सत्तेच्या माध्यमातून बांधुन पुर्णही केला. तसेच त्यांनी पाझर तलाव, टेलिफोन एक्सचेंज, पाणीपुरवठा योजना, टाकळीभान वसंत बंधारा, टाकळीभान टेलटँक ड्रेनेजचे दरवर्षी काम करून खार जमिनी होण्यापासून शेतजमीन वाचविण्यासाठी कायम स्वरूपी व्यवस्था, गावाला जोडणारे सर्व रस्ते दुरूस्ती, ग्रामपंचायत इमारत, हायस्कूल इमारत, वसंत बधारा अशी भरीव कामे केलेली असल्याने स्व.गोविंदराव आदिक यांचे नाव आजही टाकळीभान ग्रामस्थ अभिमानाने घेत आहेत. राज्याचे कृषीमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाल्यावर त्यांनी टाकळीभान टेलटँक मधून ठिबक सिंचनाद्वारे परीसरातील शेती ओलिताखाली आणण्याचा महत्वकांक्षी योजना राबवण्यासाठीही प्रयत्न केला होता. मात्र तालुक्यातील सत्ता बदलामुळे पुरेसा पाठींबा न मिळाल्याने ही योजना कागदावरच राहीली.
सध्या निळवंडे धरणाची निर्मिती होवून आता कालवे देखील चालू करण्यात आले असून त्यामुळे येत्या काळात या परीसराला पाटपाणी कमी होवून शेतीसाठी पाणी समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.या परीसरातील शेती पाटपाण्याने फुललेली आहे तर भंडारदरा धरणाच्या ओव्हरफ्लोच्या पाण्याने टेलटँक भरला जात असल्याने शेतीसाठी पुरेसे पाट पाणी न मिळाल्यास या भागाचे वाळवंट होण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे टेलटँकच्या उपलब्ध पाण्यावर ठिबक सिंचन योजना राबविल्यास शेतीची आवकळा होणार नाही. पाणी वाया जाणार नाही पाण्याची बचत होवून कमी पाण्यात जास्तीत जास्त क्षेत्राला पाणी मिळेल व पाटपाण्याची चिंता राहाणार नाही. त्यासाठी स्व. गोविंदराव आदिक यांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी आविनाश आदिक यांनी थेट टेलटँक मधून परीसराच्या शेतीसाठी ठिबक सिंचन योजना राबवण्याचा मानस व्यक्त केला असून याबाबत शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी व योजनेची माहीती देण्यासाठी श्री अविनाश आदिक टाकळीभान येथे ग्रामस्थांनच्या भेटीगाठी घेवून लोकांच्या अडीअडचणी समजावून घेण्यासाठी रविवार दिनांक ६/८/२०२३ रोजी सकाळी ठीक ९.०० वाजता ग्रामपंचायतच्या खा. गोविंदराव आदिक सभागृहात ही बैठक होणार असून सदर बैठक पक्ष विरहीत आहे तरी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.