कोल्हार ( जनता आवाज वृत्तसेवा ) :- एकापेक्षा एक सरस राष्ट्रभक्तीपर गीतांनी कोल्हारचे प्रवरा हायस्कूल ( सीबीएसई ) दुमदुमले. जुन्या आणि नव्या, मराठी आणि हिंदी भाषेतील रोमहर्षक देशभक्तीवर आधारित ही गीत गायन स्पर्धा रोमांचकारी ठरली.
लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कोल्हार बुद्रुक येथील प्रवरा हायस्कूल ( सीबीएसई ) या इंग्रजी माध्यमाच्या विद्यालयात देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धा संपन्न झाली. प्रमुख अतिथी म्हणून लोणी येथील सैनिक स्कूलचे कमांडन्ट कर्नल शेखर जोशी, पत्रकार संजय कोळसे, सुहास वैद्य, प्रमोद कुंभकर्ण, सुभाष कोंडेकर उपस्थित होते. संस्थेच्या ६ वेगवेगळ्या शाळांमधील १०६ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला.
स्पर्धेमध्ये लोणी येथील प्रवरा कन्या विद्या मंदिरने प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक प्रवरानगर येथील प्रवरा पब्लिक स्कूल तर तृतीय क्रमांक कोल्हारच्या प्रवरा हायस्कूलने प्राप्त केला. याव्यतिरिक्त प. डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सैनिक स्कूल ( लोणी ), प्रवरा सेंट्रल पब्लिक स्कूल ( प्रवरानगर ), प्रवरा गर्ल्स इंग्लिश मीडियम स्कूल ( लोणी ) यांना उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली. प्रा. अनिल गीते आणि कु. प्रतीक्षा चितळकर हे स्पर्धेचे परीक्षक होते.
प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय प्रवरा हायस्कूलचे प्राचार्य सुधीर मोरे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. एस. बी. आव्हाड यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन प्रा. डी. बी. निंबाळकर, प्रा. एस. के. शेंडे यांनी केले. उपस्थितांचे आभार प्रा. सुरेश जाटे यांनी मानले.




Total Users : 625712