श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा):- श्रीरामपूर तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या दत्तनगर ग्रामपंचायत निवडणूक निमित्ताने श्रीरामपूर पंचायत समितीचे माजी सभापती नानासाहेब शिंदे यांच्या विरोधात अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाबासाहेब दिघे गट तर गावांत प्रथमच वंचित बहुजन आघाडीचा पॅनेल मैदानात उतरणार आहे.
नागरिकांमध्ये वंचित बहुजन आघाडीची जोरदार चर्चा आहे तर दत्तनगर गावामध्ये मागासवर्गीय मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने वंचित बहुजन आघाडीने कंबर कसली आहे. नानासाहेब शिंदे यांची पाठराखण अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे हे करीत आहेत तर बाबासाहेब दिघे यांचे पाठराखण माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व अहमदनगर जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे करत असल्याचे दिसून येते. श्रीरामपूर तालुक्यातील सर्वात मोठी समजल्या जाणाऱ्या दत्तनगर ग्रामपंचायतची स्थापना सन
२००७ साली होऊन चालु पंचवार्षिक निवडणूक ही चौथ्या टप्प्यात होत असून या दरम्यान सभापती शिंदे व जिल्हा परिषदेचे सदस्य दिघे यांनी एकत्रित गावकारभार करून गावाचा विकास साधला आहे.
दरम्यानच्या काळात सन २०२० ला श्रीरामपूर तालुका पंचायत समितीचे सभापतीपदाचे आरक्षण पडून महिला म्हणून नानासाहेब शिंदे यांच्या पत्नी सौ. संगिता शिंदे यांची वर्णी लागली. या घडामोडीमध्ये पालकमंत्री ना. विखे यांना माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी मोलाची मदत केल्याने सभापतीपदी संगिता शिंदे यांची लॉटरी लागली. या घडामोडीत करण ससाणे यांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची मोठी साथ घेतली. तथापि ससाणे यांना यश मिळाले नाही. त्यापाठोपाठ श्रीरामपूर कृषि उत्पन्न बाजार समितीत सभापती पदावर सौ. संगिता शिंदे यांची नाट्यमय घडामोडीत निवड झाली. या घडामोडीत ना. विखेंनी मोठी कसरत केली. थोरात गटात करण ससाणे यांच्या माध्यमातून दुसऱ्यांदा अपयश स्विकारावे लागले.
मिनी आमदारकी समजल्या जाणाऱ्या या दोन्ही पदावर राजयोग ना. विखे यांच्या माध्यमातून शिंदे पती-पत्नीला मिळाल्याने संपूर्ण तालुक्यात विखे यांच्या नेतृत्वाखाली चांगल्या प्रकारे काम करण्याची संधी मिळाली. माजी सभापती दिपक पटारे, नानासाहेब पवार, नानासाहेब शिंदे, जिल्हा परिषद सदस्य शरद नवले वगैरेंनी विखे यांचे तालुक्याच्या राजकारणात गाठ बांधले.
माजी सभापती नानासाहेब शिंदे व माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब दिघे दत्तनगरच्या विकास कामासाठी ग्रामपंचायत स्थापनेपासून व दरम्यानच्या काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती एकत्रित लढून दोघांनाही सत्तास्थानी जाण्यास यश मिळविले. मात्र तीन वर्षांपूर्वी तालुक्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी झाल्याने सभापती शिंदे यांनी विखेंचे नेतृत्व मान्य केले, तर बासाहेब दिघे यांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरातांच्या तंबूत जाण्यास पसंत केले.
सद्यस्थितीत होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत माजी सभापती नानासाहेब शिंदे यांनी विखेंचे नेतृत्व तर माजी जि.प. सदस्य बाबासाहेब दिघे यांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात व जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे यांचे नेतृत्व मान्य करुन निवडणूकीस सामोरे जाण्याचा निर्धार व्यक्त केला.
या निवडणूकीत शिंदे यांच्या तंबुत माजी सरपंच पी. एस. निकम, आरपीआयचे विभागीय अध्यक्ष भिमा बागुल, भिमशक्तीचे संदिप मगर, युवा नेते सागर भोसले, शिवसेनेचे शरद भणगे, प्रदिप गायकवाड, सचिन ब्राम्हणे, संजय बोरगे, संदिप बागुल, जनाभाऊ खाजेकर, पंकज बागुल, राजु त्रिभुवन, सतिश ब्राम्हणे, राजु खाजेकर, राजेंद्र मगर यांच्यासह अनेकांनी विखें गटाची शिंदे यांना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. तर माजी जि.प. सदस्य बाबासाहेब दिघे यांची पाठराखण करण्यासाठी माजी सरपंच सुनिल शिरसाठ, प्रेमचंद कुंकुलोळ, बाळासाहेब विघे, हिरामण जाधव, अशोक लोंढे, शहाजहान बागवान, सुरेश जगताप यांच्यासह बहुतांश कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
या निवडणूकीत काही प्रमुख कार्यकत्यांनी अलिप्त राहण्याचे धोरण अवलंबिले आहे. दत्तनगर गावाचा भविष्यकाळात विकास होणार हा दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून येथील जनता त्यांच्याच पाठीमागे उभी राहण्याची चिन्हे दिसत आहे.
दरम्यान सरपंच पद हे लोकनियुक्त महिलांसाठी राखीव असून दुसऱ्यांदा गावात संधी उपलब्ध झालेली आहे. सरपंच पदासाठी विखे समर्थक नानासाहेब शिंदे यांनी चाचपणी करुन योग्य उमेदवारालाच सरपंच पदाचे नाव येत्या एक दोन दिवसात घोषित केले जाणार आहे. तर थोरात – दिघे गटाकडून सर्वांसाठी विचार करुन तोडीस तोड उमेदवार दिला जाण्याची शक्यता आहे. तर ग्रामपंचायतच्या – उर्वरित १७ जागेवर पात्र व सर्वसामान्यांची कामे करणाऱ्यानांच दोन्ही गटाकडून उमेदवारी दिली जाईल असे स्पष्ट करण्यात आले.
या निवडणूकीत शिंदे, दिघे गटासह नव्याने वंचित बहुजन आघाडी आखाड्यात असून लढत जोरदार होण्याची चिन्हे दिसत आहे. तर अपक्षांचाही भरणा राहील असे दिसते. तर वार्डा वार्डात एकास एक तोडीस तोड उमेदवार देताना काही अपक्ष, हौशे नवशे उमेदवार इच्छुक आहे. अपक्षांची संख्या लक्षात घेता शिंदे, दिघे गटाला यांचा फटका बसणार नाही या दृष्टीने दोन्ही गटांकडून मनधरणी करुन उमदेवारी अर्जाबाबत सावध भूमिका घेतली जात आहे. एकूणच ही निवडणूक विखे-थोरात यांच्या दृष्टीकोनाने अत्यंत महत्वाची समजली जात आहे. हे येथे निश्चित मानले जाते.



