श्रीरामपूर ( जनता आवाज वृत्तसेवा) :- येथील छत्रपती शिवाजी चौकात शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा बसविण्याची गेल्या अनेकवर्षांपासूनची मागणी श्रीरामपूरकरांकडून केली जात आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून त्यांना या प्रश्नात लक्ष घालून तो सोडविण्याची मागणी निवेदनाद्वारे भाजपचे प्रदेश प्रवक्ते नितीन दिनकर, तालुकाध्यक्ष दीपक पटारे यांनी केली.
श्रीरामाच्या नावाने असलेल्या या भुमीत छत्रपती शिवाजी चौकात शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा बसवावा यासाठी सुमारे २० वर्षांहून अधिक काळापासून मोर्चाे, आंदोलने सुरू आहेत. पालिकेने अनेकजा ठरावही केले आहे. मात्र, जागेची अडचण पुढे करत प्रशासनाकडून यावर तोडगा निघत नाही. अनेक शिवप्रेमींनी गनिमीकाव्याने चौकात महाराजांचा पुतळा बसविण्यातही आला होता. मात्र, त्यावर कारवाई करण्यात आली. अश्वारूढ पुतळ्यासाठी वारंवार मागणी केली जात आहे. अनेकदा प्रस्तावही पाठविण्यात आले आहेत. तसेच पालिकेने नाशिक येथील मैंद यांच्याकडून अश्वारूढ पुतळा बनवूनही घेतला आहे. तो सांभाळण्यासाठी महिन्याला भाडेही ठरले आहे. असे असताना ह्या प्रश्नाचे भिजत घोंगडे कायम आहे. दिनकर व पटारे यांनी नुकतीच मंत्रालयात उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेवून या विषयाला पुन्हा हात घातला. महाराजांचा आश्वारूढ पुतळा चौकात बसविण्यासाठी सहानुभूतीपूर्वक प्रयत्न करून सहकार्य करण्याची विनंती त्यांना करण्यात आली.




Total Users : 629241