कोळपेवाडी ( जनता आवाज वृत्तसेवा ):- कोपरगाव मतदार संघातील विविध विकास कामांसाठी आ. आशुतोष काळे यांनी दिलेल्या निधीतून पूर्ण झालेल्या व नव्याने करण्यात येणाऱ्या विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमिपूजन मंगळवार (दि.०५) रोजी राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते व आ. आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष माधवराव खिलारी यांनी दिली असून या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत विजयश्री प्राप्त केल्यापासून आ. आशुतोष काळे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या माध्यमातून मतदार संघाच्या विकासासाठी हजारो कोटीचा निधी आणून मतदार संघातील अनेक प्रलंबित विकासकामे सोडवून चार वर्षात मतदार संघाचा शाश्वत विकास करून दाखविला आहे.
यामध्ये अजून भर पडली असून राज्याचे महसूल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील व आ. आशुतोष काळे यांच्या सयुंक्त प्रयत्नातून कोपरगाव मतदार संघातील चांदेकसारे व सोनेवाडी परिसरात एमआयडीसी उभारण्यासाठी महायुती सरकारने मंगळवार (दि.२९) रोजी झालेल्या बैठकीत मंजुरी दिली आहे. त्यानंतर बरोबर आठच दिवसांनी ना.राधाकृष्ण विखे पाटील विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमिपूजन कार्यक्रमासाठी कोपरगाव दौऱ्यावर येत असून मंगळवार (दि.०५) रोजी ते संपूर्ण दिवस कोपरगाव मतदार संघात राहणार आहेत त्यामुळे त्यांच्या या दौऱ्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.
या दौऱ्यासाठी सकाळी दहा वाजता कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर ना.राधाकृष्ण विखे पाटील यांचे हेलिकॉप्टरने आगमन होणार आहे. त्यानंतर अकरा वाजता माहेगाव देशमुख येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे उद्घाटन व सुरेगाव येथील शासकीय वाळू डेपोचे ऑनलाईन उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर कुंभारी येथील शासकीय वाळू डेपोचे देखील उद्घाटन होणार आहे. दुपारी एक वाजता संवत्सर येथील ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचा भूमिपूजन समारंभ होणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत संवत्सर-कान्हेगाव वारी या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन होणार आहे. दुपारी दीड वाजता संवत्सर येथील श्री शनि महाराज मंदिरासमोर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले असून या ठिकाणी दिव्यांग लाभार्थ्यांना साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे.
त्यानंतर दुपारी महाराष्ट्र राज्य सहकारी दुध संघाचे अध्यक्ष माजी जिल्हा परिषद सदस्य राजेशजी परजणे यांच्या निवासस्थानी दुपारचे भोजन घेऊन चार वाजता गोदावरी खोरे दूध संघाच्या सोलर प्लँटचा पायाभरणी शुभारंभ तसेच लोकनेते नामदेवरावजी परजणे पाटील शॉपिंग कॉम्प्लेक्सचा लोकार्पण सोहळा त्यांच्या हस्ते पार पडणार आहे. सायंकाळी पाच वाजता कोपरगाव शहरातील निवारा कॉलनी येथील रस्त्याच्या कामाचा भूमिपूजन समारंभ व शहरातील व्यापारी तसेच नागरिकांशी महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील हितगुज साधनार असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष माधवराव खिलारी यांनी दिली आहे.
ना.राधाकृष्ण विखे पाटील व आ. आशुतोष काळेंचा जाहीर नागरी सत्कार
आ. आशुतोष काळे यांनी वर्षानुवर्षापासून प्रलंबित असलेली अनेक विकास कामे निवडून आल्यानंतर पूर्ण करण्याचे मतदार संघातील जनतेला २०१९ च्या निवडणूक जाहीरनाम्यात आश्वासित केले होते. त्यामध्ये मतदार संघात एमआयडीसी उभारण्याचा महत्वाचा मुद्दा देखील होता. बेरोजगारांच्या हाताला काम त्याचबरोबर मतदार संघाचा विकास असा दुहेरी दृष्टीकोन त्यांना साधायचा होता. त्यासाठी निवडून आल्यापासून ते करीत असलेल्या अविरत प्रयत्नांना महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचे पाठबळ मिळाले. महसूल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील व आ. आशुतोष काळे यांच्या सयुंक्त प्रयत्नातून कोपरगाव मतदार संघात एमआयडीसी उभारण्यावर महायुती सरकारने शिक्कामोर्तब केले. हा मतदार संघाच्या दृष्टीने ऐतिहासिक निर्णय असून त्यामुळे बेरोजगार युवकांच्या भविष्यात आशेचा किरण निर्माण होवून युवा वर्गाला नवी उमेद मिळाली आहे. त्यामुळे संपूर्ण कोपरगाव मतदार संघाच्या वतीने ना.राधाकृष्ण विखे पाटील व आ. आशुतोष काळे यांचा जाहीर नागरी सत्कार करण्यात येणार आहे.