जालना (जनता आवाज वृत्तसेवा):- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरंगे हे मुंबई आंदोलनावर ठाम असल्याने आता सरकारकडून देखील त्यांच्या मनधरणीचा प्रयत्न केला जात आहे.आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी सरकारकडून पुन्हा एकदा सरकारचे शिष्टमंडळ मनोज जरांगे यांची भेटीला जाणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी मंगेश चिवटे यांचा समावेश आहे. सोबतच, बच्चू कडू देखील उपस्थित राहणार आहे. विशेष म्हणजे यावेळी शिष्टमंडळाच्या वतीने नवीन ‘ड्राफ्ट’ सादर केला जाणार आहे. त्यामुळे यावर जरांगे यांची भूमिका काय असणार हे पाहणं महत्वाचे असणार आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे हे मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण करणार असून, यासाठी 20 जानेवारीला ते आंतरवाली सराटी गावातून पायी दिंडी काढणार आहे. त्यांच्या याच आंदोलनामुळे सरकारची अडचण वाढू शकते. त्यामुळे, सरकारकडून 20 जानेवारीला सुरु होणाऱ्या आंदोलनापूर्वी मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावण्यासाठी हालचाली वाढल्या आहेत. काल बच्चू कडू यांनी जरांगे यांची भेट घेऊन, अनेक मुद्द्यावर चर्चा केली. यावेळी जरांगे यांनी काही दुरूस्ती करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर आज सरकारच एक शिष्टमंडळ जरांगे यांची भेट घेण्यासाठी येत आहे. त्यामुळे आजच्या या भेटीत काही मार्ग निघतो का? हे पाहणं महत्वाचे असणार आहे.