लोणी, दि.८( जनता आवाज वृत्तसेवा):-लोणी बुद्रूक गावचे भूमीपुत्र आणि लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी डॉ.नितीन करीर यांची राज्याचे मुख्य सचिव पदावर निवड झाल्याबद्दल लोणी बुद्रूक ग्रामस्थांच्या वतीने रविवारी नागरी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवार दि.१० मार्च २०२४ रोजी सकाळी १० वाजता लोणी बुद्रूक येथील श्रीराम मंदिर प्रांगणात नागरी सत्कार सोहळा संपन्न होणार आहे. माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यास वरद विनायक सेवा धामचे मठाधिपती ह.भ.प उध्दव महाराज मंडलिक आणि महसूल तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते डॉ.नितीन करीर यांचा नागरी सत्कार करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास खासदार डॉ.सुजय विखे पाटील, सदाशिव लोखंडे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सिध्दराम सालिमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आधिकारी डॉ.आशिष येरेकर यांच्यासह प्रशासनातील आधिकारी आणि विविध संस्थांच्या पदाधिका-यांना लोणी ग्रामस्थांच्या वतीने निमंत्रीत करण्यात आले आहे.
डॉ.नितीन करीर हे लोणी बुद्रूक गावचे भूमीपुत्र असून, गेली अनेक वर्षे त्यांचे वास्तव्य या गावात राहीले आहे. प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा पब्लिक स्कुलमध्ये त्यांनी आपले प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पुर्ण केले. बारावीनंतर वैद्यकीय शाखेची पदवी घेतल्यानंतर त्यांनी प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी केलेल्या सर्व प्रयत्नामध्ये मोठे यश मिळविले, राज्यात प्रथम येण्याचा नावलौकीक मिळविला. राज्याच्या प्रशासकीय सेवेत विविध पदांवर काम करताना त्यांनी आपल्या अचुक अशा निर्णय क्षमतेने वेगळेपण सिध्द केले.
प्रशासकीय सेवेतील त्यांचा प्रदीर्घ अनुभव लक्षात घेवून राज्याचे मुख्य सचिव म्हणून मिळालेला बहुमान लोणी बुद्रूक ग्रामस्थांच्या दृष्टीने मोठा अभिमान असल्याने त्यांचा नागरी सत्कार करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला. या कार्यक्रमाची जय्यत तयारी ग्रामस्थांनी सुरु केली असून, प्रमुख पदाधिका-यांची नियोजन बैठकही मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. लोणी बुद्रूक ग्रामस्थांच्या वतीने डॉ.नितीन करीर यांना मानपत्र, स्मृतीचिन्ह देवून सन्मानित करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे औचित्य साधूनच लोणी खुर्द येथे जिल्हा परिषद शाळेचे बांधा, वापरा, हस्तांतरीत करा या तत्वाने विकसीत करण्यात आलेल्या व्यापार संकुलाचे उद्घाटन आणि लोणी बुद्रूक ग्रामसचिवालय कार्यालयाच्या प्रस्तावित नवीन इमारतीचे भूमीपुजन डॉ.नितीन करीर यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.