संगमनेर ( जनता आवाज वृत्तसेवा):- सदैव हसतमुख ,अभ्यासू, हजरजबाबी, व रुबाबदार व्यक्तिमत्व असलेल्या स्वर्गीय विलासराव देशमुख यांनी महाराष्ट्राच्या विकासाकरता मोठे योगदान दिले असून संगमनेर तालुका व आमदार थोरात यांच्यावर विशेष प्रेम केले. त्यांच्या आठवणी सदैव राज्यातील जनतेच्या मनात असून स्वर्गीय देशमुख हे विकासाची दूरदृष्टी असलेले कर्तबगार नेते होते असे गौरव उद्गार जयहिंद लोकचळवळीचे संस्थापक मा. आ. डॉ. सुधीर तांबे यांनी काढले आहे.
काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन जनसंपर्क कार्यालयात स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी तालुकाध्यक्ष मिलिंद कानवडे, प्रा बाबा खरात, युवक कार्याध्यक्ष सुभाष सांगळे, आनंद वर्पे, रमेश गपले, संजय गडाख, तात्याराम कुटे ,श्रीराम कु-हे, सत्यजित थोरात, नामदेव कहांडळ आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना मा.आ.डॉ.तांबे म्हणाले की, स्वर्गीय विलासराव देशमुख यांचे रुबाबदार व्यक्तिमत्व आजही प्रत्येकाच्या मनामनात आहे. महाराष्ट्राच्या विकासात त्यांनी मोठे योगदान दिले आहे.अत्यंत हुशार कर्तबगार आणि दूरदृष्टी असलेल्या या नेतृत्वाच्या अष्टपैलू आणि हजरजबाबीपणामुळे विरोधी पक्षांमध्ये ही त्यांचा मोठा चाहता वर्ग होता.
सदैव जनमाणसांच्या विकासाचे काम करणारे विलासराव देशमुख यांनी काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर बंधुवत प्रेम केले. संगमनेर तालुक्यात आणि विकासाच्या योजनांसाठी सातत्याने मोठी मदत केली. त्यांच्या अचानक निधनाने काँग्रेस पक्षाची आणि राज्याची मोठी हानी झाली आहे. दहा वर्षे झाले तरी विलासराव देशमुख साहेब यांची भाषणे आणि त्यांचे व्यक्तिमत्व प्रत्येकाच्या मनामनात आहे. त्यांचे कार्य तरुण पिढीसाठी सदैव प्रेरणास्त्रोत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
तर मिलिंद कानवडे म्हणाले की, काँग्रेसजणांना ऊर्जा देण्याचे काम सदैव विलासराव देशमुख यांनी केले. हीच परंपरा काँग्रेसनेते आमदार बाळासाहेब थोरात हे पुढे नेत आहेत. काँग्रेस हा सर्वांना सामावून घेणारा पक्ष आहे. अनेक आव्हाने आली तरी काँग्रेस ही देशहिताची व लोकशाहीची विचारधारा असल्याने टिकून राहील असेही ते म्हणाले.
याप्रसंगी संगमनेरकरांच्या वतीने स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.