श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा ):- श्रीरामपूर तालुक्यातील अकारी पडीत जमीनी शेतक-यांना पुन्हा देण्याबाबत झालेल्या निर्णयाची अंमलबाजावणी महिन्याभरात पूर्ण करण्याची ग्वाही महसूल तथा पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आकारी पडीत जमीन मालक शेतकऱ्यांनी आज मंत्री विखे पाटील यांची भेट घेवून त्यांचा सत्कार केला.याप्रसंगी शेतकऱ्यांशी संवाद साधला सर्वाच्या योगदानामुळे यश मिळाल्याचे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस अजित पवार यांचेही सहकार्य मोठे असल्याचे विखे पाटील यांनी आवर्जून सांगितले.
अकारी पडीत जमीनींच्या संदर्भात प्रशासकीय आणि न्यायालय स्तरावर अनेक वर्षे प्रश्न प्रलंबित होता. तालुक्यातील सुमारे साडेसात हजार एकर जमीनींच्या संदर्भात असलेल्या प्रश्नाच्या बाबत शेतक-यांना अनेक वर्षानुवर्षे संघर्ष करावा लागला. राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर खंडकरी शेतक-यां प्रमाणेच अकारी पडीत जमीनींच्या संदर्भात सुध्दा तातडीने निर्णय होण्याकरीता महसूल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंत्रालयात सातत्याने बैठका घेवून शेतक-यांच्या हिताच्या दृष्टीने निर्णय होईल अशी भूमिका घेतली होती. संभाजीनगर उच्च न्यायालयात याबाबत दाखल झालेल्या याचिकेमध्ये सुध्दा सरकारने प्रभावी बाजू मांडून शेतक-यांना न्याय कसा मिळेल हीच भूमिका घेतली होती.सरकारच्या भूमिकेवर न्यायालयानेही सकारात्मक निर्णय दिल्याने शेतकऱ्यांना न्याय मिळाला असल्याचे विखे पाटील म्हणाले.
राज्यात महायुती सरकार आल्यानंतर याबाबत वेळोवेळी मंत्रालय स्तरावर झालेल्या बैठका, न्यायालयीन लढाईत मांडली गेलेली सकारात्मक भूमिका यासर्वांचे यश हे आता शेतक-यांच्या बाजूने उभे राहीले.यापुर्वी स्व.बाळासाहेब विखे पाटील यांच्यासह अनेक शेतकऱ्यांना यासाठी संघर्ष करावा लागला होता.तालुक्यातील सुमारे नऊ गावातील शेतक-यांना त्यांच्या जमीनी पुन्हा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, न्यायालयाने आठ आठवड्यांची मुदत दिली असली तरी विधानसभेच्या निवडणुकीपुर्वी या जमीनी शेतकऱ्यांना देण्याबाबतची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.