श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा):- कोलकत्ता येथील महिला डॉक्टर वर झालेल्या अत्याचार आणि हत्तेनंतर आता ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे एका शाळेतील स्वच्छता कर्मचाऱ्याने दोन चिमूरड्यांवर लैंगिक अत्याचार केले. ही घटना माणुसकीलाच नव्हे तर भारतीय संस्कृतीलाच काळीमा फासणारी असल्याचे महाराष्ट्र प्रदेश युवा काँग्रेसच्या उपाध्यक्षा सौ.दिपालीताई ससाणे यांनी म्हटले आहे.
श्रीरामपूर युवक काँग्रेसच्या वतीने बदलापूर येथे घडलेल्या अमानुष घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र शासन व पोलीस प्रशासनाच्या विरोधात धडक मोर्चा काढण्यात आला, त्याप्रसंगी सौ. ससाणे बोलत होत्या. यावेळी महायुती सरकार विरोधात निदर्शने करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सौ.ससाणे पुढे म्हणाल्या की या घटनेमुळे महाराष्ट्रात महायुती सरकार विरोधात जनतेमध्ये संतप्त भावना निर्माण झाल्या आहेत. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून महिला भगिनींच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
आम्हाला लाडकी बहिणी योजना नको सुरक्षित बहीण योजना हवी आहे. अलीकडच्या काळात महिलांवर होणाऱ्या छेडछाड आणि इतर हिंसक घटनांमुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः विद्यार्थिनी, कामकाज करणाऱ्या महिला आणि गृहिणी या सर्वांमध्ये रात्रीच्या वेळी प्रवास करताना असुरक्षितता जाणवू लागली आहे. त्यामुळे छेडछाड आणि इतर गुन्ह्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या परिसरामध्ये विशेषता रात्रीच्या वेळी पोलीसगस्त वाढवणे, हेल्पलाइन जागरूकता, स्वसंरक्षण कार्यशाळा, सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे गरजेचे आहे .
महिला सुरक्षेच्या बाबतीत महायुती सरकार सपशेल अपयशी ठरले असून देशात महिला अत्याचाराच्या घटना वारंवार घडत आहेत. बदलापूर प्रकरणी पोलिसांनी कोणाच्या दबावाखाली तक्रार नोंदवून घेण्यास दिरंगाई केली? संबंधित संस्थाचालक कोणत्या राजकीय पक्षाशी संबंधित आहे? बदलापूर प्रकरणी आंदोलनासाठी रस्त्यावर आलेल्या आंदोलकांवर लाठी चार्ज का झाला? असे अनेक संतप्त सवाल आंदोलकांनी यावेळी उपस्थित केले. त्यामुळे महिला सुरक्षेच्या बाबतीत सरकारने ठोस पावले उचलावी व या घटनेतील आरोपी विरोधात जलद गती न्यायालयात खटला चालवून पोक्सा कायद्या अंतर्गत आरोपीस कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी यावेळी आंदोलकांच्या वतीने करण्यात आली.
यावेळी मा नगरसेविका संगीताताई मंडलिक, राणी देसर्डा, भारती रासकर, सुजाता बारगळ, त्रिवेणी गोसावी, शोभाताई भारसाकळ, बोधक मॅडम, ईश्वरी इनामके, सना सय्यद, मीना हासे, सुलताना पिंजारी, सईदा पिंजारी, यास्मिन पठाण, सोनाली ठोकळ, आशा उमाप, अनिता मावस, सुवर्णा साठे, युवक काँग्रेसचे विधानसभा उपाध्यक्ष अमोल नाईक, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष रितेश चव्हाणके, शाहरुख शेख, एन एस यू आय चे वैभव कुऱ्हे, सनी मंडलिक, गणेश गायधने, विशाल साळवे, श्रेयस रोटे, आकाश जावळे, अक्षय जोंधळे, कल्पेश पाटणी आदी आंदोलनकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.