करंजी( जनता आवाज वृत्तसेवा ): — शेती मशागतीसाठी लागणाऱ्या बैलांची जागा ट्रॅक्टरने घेतली असली तरी शेतकऱ्यांचे बैलावरचे प्रेम अपार आहे त्यामुळे पाथर्डी तालुक्यातील करंजी,चिचोंडी,तिसगाव,मिरी परिसरातील बाजारपेठा श्रावणी बैलपोळ्याच्या निमित्ताने सजून गेल्या आहेत.यंदा तालुक्यात सर्वदूर समाधानकारक पाऊस झाल्यामुळे बळीराजा समाधानी आहे.त्यामुळे आपल्या लाडक्या सर्जा राजासाठी आकर्षक साहित्य घेण्यासाठी शेतकऱ्यांमधून उत्साहाचे वातावरण दिसून आले.
घुगरमाळ,सुताचेकासरे,शेंब्या,पितळेतोडे,गोंडे,घुंगरू,मोरखी,घाटी,सरजोडी,हिंगुळ यासह विविध आकर्षक साहित्य घेण्यासाठी शेतकऱ्यांची आठवडे बाजारच्या दिवशी लगबग दिसून आली.यावर्षी बैल सजावटीच्या भावात काही प्रमाणात वाढ झाली असल्याचे देखील व्यापाऱ्यानी आवर्जून सांगितले.
वर्षभर शेतात राबणाऱ्या आपल्या सर्जा राजाला सजवण्यासाठी विविध साहित्य खरेदीसाठी शेतकरी आठवडे बाजारच्या निमित्ताने आवर्जून आले होते.यंदा खरीप हंगाम जोरात असून जनावरांना हिरवा चारा मुबलक उपलब्ध आहे त्यामुळे यंदा पोळ्याचा सण जल्लोषात साजरा करण्याची तयारी शेतकऱ्यांकडून केली आहे.दरवर्षी श्रावणी पोळ्यानिमित्त काही सधन शेतकऱ्यांच्या बैलांच्या अंगावर दिसून येणाऱ्या महागड्या झुली आता मात्र नजरेआड झाले आहेत.बैल शेती ऐवजी ट्रॅक्टर शेतीला शेतकऱ्यांची पसंती असल्याने बैलांची संख्या झपाट्याने कमी होत आहे.त्यामुळे महागड्या झुली आता बाजारातून गायब झाल्या आहेत.तसेच पोळ्याच्या सणा पुरतेच बैलांची खरेदी करणारे देखील काही शौकीन कमी नाहीत.