श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा):- नगर जिल्ह्यासह ग्रामीण भागामध्ये काल, पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळाली. राहुरी, श्रीरामपुर, नेवासा, पाथर्डी, लोणी यांसह आदी भागात रविवारी व सोमवारी सलग दोन दिवस दमदार पावसाने हजेरी लावल्याने खरिपाला दिलासा मिळाला. मात्र शेतात जास्त पाणी झाल्याने कपाशी व इतर पिके नासण्याची भिती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.
सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यात शेतकऱ्यांचा बैलपोळा सण असल्याने बैलांना सजवण्याची तयारी असतांना दुसरीकडे मात्र पाऊस उघडायचा नाव घेत नव्हता.
महिना, दीड महिन्यापासून मान्सूनच्या पावसाने तालुक्यात पाठ फिरवली होती. नुकतेच दररोज ढगाळ वातावरण होवून पावसाचा प्रतिक्षा करावी लागत होती. वाऱ्यामुळे फक्त पावसाचे वातावरण निर्माण होत होते. खरिप हंगामातील कपाशी, तूर, सोयाबीन, मका, बाजरी आदि पिके पाण्याअभावी धोक्यात आली होती. पंरतु अधूनमधून येणाऱ्या रिमझिम पावसाने पिकांना दिलासा मिळाला होता.
मध्यंतरी पावसाने खंड दिल्याने शेतकऱ्यांनी पिकांतर्गत मशागतीची कामे उरकून घेतली होती. त्यातच काल रविवारी (दि.१) सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास दमदार पावसाने सुरूवात केली तर काल सायंकाळच्या दरम्यात थोडीफार उघडझाप दिली. मात्र काल सोमवारी दिवसभर कमी अधिक प्रमाणात सुरूच होता. वारा नसल्याने भीज पावसाने शेतात ठिक ठिकाणी तळे निर्माण केली होती. तर अनेक ठिकाणी रस्त्यावर नदीचे स्वरूप आल्याचे दिसून आले होते.
श्रीरामपुर, राहुरी, पाथर्डी आणि नेवासा तालुक्यातील कुकाणा मंडळात सर्वाधिक ११४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे तर सर्वात कमी चांदा मंडळात २३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. कुकाणा, सलाबतपूर, घोडेगाव, वडाळा बहिरोबा, सोनई या परिसरात दमदार पावसाची बॅटींग झाली आहे. तर नेवासा खुर्द, नेवासा बुद्रुक व चांदा परिसरात समाधानकारक पाऊस झाला आहे. रविवारी रात्री व सोमवारी दिवसभर तालुक्यातील सर्वत्र या पावसाने हाहाकार केल्याने शेतात पाणीच पाणी साचले आहे. ओढ्यानाल्यांना पूर आला आहे. तालुक्यात जिवितहानी मात्र झाली नसल्याचे महसुल विभागाने सांगितले.
जिल्ह्यातील बहुतांशी जलाशये भरले?
अहमदनगर जिल्ह्यात मान्सूनच्या आगमनापासून तर आता पर्यंत मोठा पाऊस झाला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील बहुतांश जलाशय देखील भरले आहेत. सरासरीमध्ये विचार केला तर १ जून ते ३१ ऑगस्टदरम्यान अहमदनगर जिल्ह्यात सरासरीपेक्षा १६९ टक्के अधिक पावसाची नोंद झाली. मुळा, भंडारदरा आदी धरण भरले असून जायकवाडी देखील भरण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.