संगमनेर( जनता आवाज वृत्तसेवा):-विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेस पक्षाची कोकण विभागीय आढावा बैठक भाईंदर (पश्चिम) येथे आज पार पडली. या आढावा बैठकीचा शुभारंभ आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून करण्यात आला.
यावेळी काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला जी यांच्यासह काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित राहून काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला.
याप्रसंगी व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधानपरिषद गटनेते सतेज पाटील, खासदार चंद्रकांत हंडोरे, काँग्रेसचे कार्याध्यक्ष मुझफ्फर हुसैन, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, कोकण विभागाचे प्रभारी बी.एम.संदीप, आमदार भाई जगताप यांसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी, मीरा-भाईंदर आणि पालघर-विरारचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
विधिमंडळ पक्ष नेते बाळासाहेब थोरात यावेळी म्हणाले की, महायुती सरकारला सत्तेचा अंहकार झाला आहे, सर्वसामान्य जनतेला गाडीखाली चिरडून टाकणारे सत्ताधारी पक्षातील नेत्यांचेच नातवाईक आहेत. महायुतीचे सरकार भ्रष्ट मार्गाने आलेले आहे, आजही वाड्या वस्त्यावर ५० खोके एकदम ओके, हे विसरले नाहीत. भ्रष्ट युती सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार केला. पंतप्रधानांनी ज्यांच्यावर ७० हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला, त्यालाच चार दिवसांनी सरकारमध्ये घेतले व तिजोरीच्या चाव्या दिल्या. ना खाऊंगा, ना खाने दुंगा म्हणाऱ्यांनीच भ्रष्टाचाऱ्यांना सत्तेत घेतले. भ्रष्टाचारावर बोलण्याचा भाजपाला अधिकार नाही. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका होतील, त्या निवडणुकाही महत्वाच्या आहेत त्यासाठी आतापासूनच काम करा. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय होऊन मविआचाच मुख्यमंत्री होईल असा विश्वासही थोरात यांनी व्यक्त केला.