कोपरगाव( जनता आवाज वृत्तसेवा):- कोपरगाव शहरात भरदिवसा गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. गोळीबारामुळे कोपरगाव शहरात एकच खळबळ उडाली आहे. या गोळीबारात एक जण गंभीर जखमी झाला असून कोपरगाव शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोपरगाव शहरातील श्री स्वामी समर्थ मंदिर परिसरात दोन मुस्लिम तरुणांची शाब्दिक बाचाबाची झाली. या बाचाबाची रूपांतर शिगेला पोहचला व त्यातील एका तरुणाने दुसऱ्या तरुणावर गोळीबार केला. नंतर गोळीबार केलेल्या तरुणाने घटना स्थळावरून पळ काढल्याचे प्रथमदर्शनी नागरिकांकडून बोलले जात आहे.
या गोळीबारात तणवीर हमीफ रंगरेज (वय 36) हा तरुण गंभीररीत्या जखमी झाला आहे. त्याला उपचारांसाठी तात्काळ नाशिक येथे हलविण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच शिर्डी येथील उपविभागीय पोलीस अधीक्षक शिरीष वमने घटनास्थळी दाखल झालेले आहेत.
मात्र या दोन मुस्लिम तरुणांमध्ये गोळीबार का झाला? गोळीबारापाठीमागे नेमके काय कारण आहे? तरुणांमधील गोळीबार हा अवैद्य धंद्यातून झाला की, आर्थिक देवाणघेवाणीतून झाला? हे मात्र गुलदस्त्यात असून गोळीबाराचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या घटनेचा तपास कोपरगाव पोलीस करत आहे.