राहाता (जनता आवाज वृत्तसेवा):– “विखे पाटील परिवार नेहमीच जनतेच्या सेवेत समर्पित राहिला आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत जनतेच्या हितासाठी काम करेल,” असे भावनिक उद्गार डॉ. सुजय विखे पाटील यांनी काढले.
ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रचारार्थ राहाता येथे आयोजित दौऱ्यात डॉ. सुजय दादा विखे पाटील यांनी राबियानगर, साई नगर, त्रिशूळ नगर, लोकरूची नगर, बागडे वस्ती या भागांत ग्रामस्थ आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या प्रसंगी रघुनाथ बोटे आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी प्रचाराची दिशा देत, आगामी निवडणुकीत क्रमांक १ वर असलेल्या कमळ चिन्हावर बटण दाबून प्रचंड मतांनी विजय मिळवण्याचे आवाहन केले.
डॉ. विखे पाटील यांनी येत्या काळात शिर्डी येथे उभारल्या जाणाऱ्या अत्याधुनिक हॉस्पिटलमुळे स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असे सांगून, हा प्रकल्प सर्वसामान्य जनतेच्या फायद्यासाठी राबवण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले. त्यांनी राहाता शहरातील पाण्याच्या गंभीर समस्येवर पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नांमुळे समाधान करण्यात यश आले असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे, गटार व्यवस्थेत असलेल्या समस्यांवर देखील त्यांनी नाराजी व्यक्त केली आणि माजी नगराध्यक्षांच्या प्रशासनावरील त्रुटींवर टीका केली.
तसेच, डॉ. विखे पाटील यांनी समोरच्या उमेदवारांवर टीका करत, “त्यांचा डिझेल खर्च संगमनेरहून चालतो,” असे म्हणत विरोधकांवर हल्ला चढवला.
महायुती सरकारच्या कार्यावर प्रकाश टाकत, डॉ. विखे पाटील यांनी सांगितले की, महायुती सरकारच्या नेतृत्वात विविध कल्याणकारी योजना राबवल्या गेल्या आहेत. शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी विशेष योजनांची अंमलबजावणी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा योजनांतील लाभ पोहोचवून त्यांना मदत करण्यात आली आहे. लाईट बिलांमध्ये सवलत देऊन शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. यामुळे शेतकरी बांधवांनी यंदाची दिवाळी आनंदाने साजरी केली.
तसेच, महायुती सरकारच्या माध्यमातून ग्रामीण भागात रस्ते, जलसिंचन, शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्यात आल्या आहेत. या सरकारने ग्रामीण जनतेच्या अडचणींना प्राधान्य देऊन, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी तत्परता दाखवली आहे. डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले की, महायुती सरकारच्या पुढाकाराने संपूर्ण राज्यात सर्वांगीण विकास साधला जात आहे, ज्याचा लाभ थेट जनतेपर्यंत पोहोचत आहे.