नेवासा( जनता आवाज वृत्तसेवा ):-नेवासा पोलिसांनी नारायणवाडी रस्त्यावरील जबरी चोरी करणाऱ्या तिघांपैकी एका आरोपीस दोन तासात शिताफीने पकडले आहे. त्यास न्यायालयाने ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या चोरी प्रकरणी आणखी चो-या उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.
मध्यंतरी अथर्व प्रवीण शिरभाते रा. पंचवटी, नाशिक हा त्याच्या मामास जमीन घ्यायची असल्याने मामास जमीन पाहण्यासाठी नेवासा येथे आला होता. नेवासा ते नारायणवाडी रोड लगत असणारी शेत जमीन पाहण्यासाठी पायी जात असताना शहराजवळील मारुतीनगरकडे जाणाऱ्या रोडवर होंडा कंपनीच्या एका एचएफ डीलक्सवर मोटर सायकलवर बसून अचानक तीन अनोळखी ईसम जवळ आले व इथे काय करतो असे दरडावून विचारुन त्यातील एका ईसमाने फिर्यादी अथर्व शिरभाते यांना चाकू दाखवून गळ्यातील एक तोळ्याची सोन्याची चैन व हातातील प्रत्येकी दीड तोळ्याच्या सोन्याच्या तिन अंगठ्या जबरदस्तीने काढून घेऊन पोबारा केला होता.
या बाबतची नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक धनंजय जाधव फौजफाट्यानिशी तातडीने घटनास्थळावर दाखल झाले होते. फिर्यादीकडून घटनेची माहिती घेतली, घटनास्थळाच्या आजूबाजूची पाहणी करून फिर्यादीने दिलेल्या वर्णनानुसार आरोपींची ओळख पटवण्यासाठी घटनास्थळाच्या परिसरातील व नेवासा शहरातील सीसीटीव्ही फुटेजची युद्ध पातळीवर बारकाईने तपासणी केली असता नेवासा पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार मलिंगा उर्फ आकाश जगधने व त्याच्या सोबत आणखी दोन अनोळखी तरुण असल्याचे दिसून आले. त्या दृष्टीने पोलिसांनी मलिंगा व त्याच्या मित्रांना पकडण्यासाठी तीन पोलीस तपास पथके तयार करून लपण्याच्या ठिकाणावर शिघ्रगतीने छापे घातले असता सतीश इरले वय २८ वर्ष रा. लक्ष्मीनगर नेवासा यास पाठलाग करून शिताफिने पकडले परंतु मलिंगा जगधने व साथीदार मुसा बागवान फरार होण्यास यशस्वी झाले . आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यास अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोज अहिरे, पोलीस हवालदार अजय साठे, पोलीस नाईक अरुण गांगुर्डे, पोलीस कॉन्स्टेबल सुमित करंजकर, अवि वैद्य, आप्पा वैद्य, आप्पा तांबे, समीर शेख, नारायण डमाळे, अमोल साळवे, गणेश जाधव यांनी केली.
दरम्यान अटक आरोपीने जबरीने चोरून नेलेल्या दागिन्या पैकी दिड तोळ्याचे लॉकेट प्रवरा संगम येथील सराफास विकले होते ते गुन्ह्यात जप्त करण्यात आले आहे.सराईत गुन्हेगार मलिंगा जगधने याचा नेवासा पोलीस कसुन शोध घेत असून त्यास लवकरच जेरबंद करू असा विश्वास पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी व्यक्त केला आहे.



