लोणी( जनता आवाज वृत्तसेवा ) :- राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक येथील प्रदीपराज भोंडे यांची शिवसेना शिंदे गटाच्या ओबीसी व्हीजेएनटीच्या अहिल्यानगर उत्तर विभाग जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांना नुकतेच प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब किसवे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले आहे.
जिल्हाध्यक्ष भोंडे यांना दिलेल्या नियुक्तीपत्रात म्हटले आहे की, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना सचिव संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना अहिल्यानगर उत्तर विभागाच्या ओबीसी व्हीजेएनटीच्या जिल्हाध्यक्षपदी (अकोले, संगमनेर, राहाता, कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासा) नियुक्ती करण्यात येत आहे.
तसेच आपण शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण सक्रियपणे प्रचार प्रसार कराल व पक्ष वाढीसाठी सर्वांना सोबत घेऊन कार्य कराल, असे दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
जिल्हाध्यक्ष प्रदीपराज भोंडे यांच्या निवडीने त्यांचे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक स्तरातून अभिनंदन होत आहे.



