6.1 C
New York
Friday, March 14, 2025

Buy now

spot_img
spot_img

पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे कार्य देशवासियांसाठी प्रेरणादायी- प्रा. राम शिंदे

अहिल्यानगर( जनता आवाज वृत्तसेवा ):- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये समाजाच्या कल्याणासाठी कार्य केले. त्यांचे हे कार्य संपूर्ण देशवासियांसाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी केले.

चौंडी येथे लोकमाता अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी समारोह समिती व महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती महोत्सवानिमित्त अभिवादन समारोहाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रा.शिंदे बोलत होते.

यावेळी राज्याच्या महिला व बालविकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, आमदार मोनिका राजळे, बीजमाता राहीबाई पोपेरे, माजी केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार, माजीमंत्री अण्णासाहेब डांगे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी सोहळा केंद्रीय समितीच्या सचिव कॅप्टन मीरा दवे, चौंडीच्या सरपंच मालनताई शिंदे, महर्षी कर्वे शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्ष स्मिता कुलकर्णी, डॉ. पी.व्ही. शास्त्री आदी उपस्थित होते.

प्रा. राम शिंदे म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये धर्म आणि समाजाच्या विकासासाठी काम केले. देशातील १२ ज्योतिर्लिंगाच्या जीर्णोद्धाराबरोबरच मंदिर निर्माणासाठी काम करत अनेक संघर्षातुन एक इतिहास निर्माण केला. सामाजिक न्याय, महिलांचे कल्याण, व्यापार, कृषी व न्याय व्यवस्थेसाठीचे त्यांचे कार्य आजही सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे ३०० वे जन्मशताब्दी वर्ष संपूर्ण देशभरामध्ये साजरे करण्यात येत आहे. चौंडी विकास कामाच्या बृहत आराखड्यासंदर्भात लवकरच मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याचेही ते म्हणाले.

प्रास्ताविक श्रीमती स्मिता कुलकर्णी यांनी केले. सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर आधारित नृत्य नाटिकेने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते ‘एकता’ मासिकाचे तसेच ‘अदम्य चैतन्याची महाराणी’ या पुस्तकाचे विमोचन करण्यात आले.

कार्यक्रमस्थळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर आधारित प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले होते.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर आधारित परिसंवाद व चर्चासत्र संपन्न पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनचरित्रावर आधारित परिसंवादातून व चर्चासत्रातून त्यांचे अद्वितीय नेतृत्वगुण, सामाजिक न्यायासाठी घेतलेले निर्णय, धर्म व प्रशासन यातील संतुलन या विषयावर विचारमंथन करण्यात आले.

अहिल्यादेवींनी त्यांच्या कारकीर्दीत प्रजाहितासाठी अंमलात आणलेली तत्त्वे, विशेषतः न्यायदान व करप्रणाली ही वाखाणण्याजोगी होती. विविध धार्मिक स्थळांचे पुनर्निर्माण, राज्यव्यवस्थेची जबाबदारी आणि स्त्रीशक्तीच्या दृष्टिकोनातून त्यांचे योगदान अतुलनीय होते. व्यापार, शेती आणि करसंकलनाचे सुधारित धोरण व्यापार आणि अर्थव्यवस्थेला बळकटी देणारे होते तर मराठा साम्राज्याच्या हितासाठी त्यांनी राबवलेले संरक्षण व सैन्यव्यवस्थापनाचे धोरण राज्यव्यवस्थेला दिशादर्शक ठरले असल्याचा सूर या परिसंवादातून निघाला.

परिसंवादात चिन्मई मुळे, डॉ.माला ठाकूर, डॉ. आदिती पासवान, नयना सहस्त्रबुद्धे, डॉ. माधुरी खांबोटे आदींनी सहभाग घेतला. यावेळी विविध विभागामध्ये चर्चासत्रही संपन्न झाले.

कार्यक्रमास राज्यभरातून महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

 

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!