शिरसगाव (जनता आवाज वृत्तसेवा):- भंडारदरा धरणाची रब्बीचे दुसरे आवर्तन दिनांक ५/२/२०२५ आवश्यक होते. परंतु मंत्री महोदयांनी ८ तारखेला आवर्तन सोडण्याच्या सूचना पाटबंधारे विभागाला दिल्या असता ८ तारखेलाही पाणी सुटण्याच्या आशा मावळल्या आहे. काल झालेल्या जिल्हा नियोजन बैठकीमध्ये पालकमंत्र्यांनी सदर आवर्तन 12 तारखेला घेण्याच्या सूचना दिल्या. पाणी असून देखील रब्बीचे दुसरे आवर्तन गहू या पिकासाठी सात ते आठ दिवस उशिरा सुटत असल्याने पिकांवर परिणाम होणार आहे.
धरणात पूर्ण क्षमतेने पाणी असल्यामुळे कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर ऊस लागवडीस भुसार पिके केली आहेत. मागील वर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना रब्बीमध्ये पिके घेता आले नाही. त्यामुळे यावर्षी कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी मोठा खर्च करून पिके उभे आहेत. सदर उशिरा सुटत असलेल्या आवर्तनामुळे रब्बीस पिकांवर पाण्याचा ताण बसत आहे. अशा परिस्थितीत विजेचाही लपंडाव असून कमी दाबाने वीज पुरवठा होत आहे.
तरी पाटबंधारे विभाग उशिरा घेत असलेले रब्बीचे दुसरे आवर्तन पूर्ण दाबाने धरणातून सुरू करून टेल टू हेड सिंचन प्रणालीच्या प्रचलित नियमाप्रमाणे शेती सिंचन करावे. तसेच बेलापूर कॅनॉल व एन बी कॅनॉल एकाच वेळी चालण्यासाठी श्रीरामपूर हेडला किमान ५०० क्युसेकने पाणी पुरवठा होण्यासाठी नियोजन करावे अशी मागणी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांनी या पत्रकाद्वारे केली आहे.