संगमनेर( जनता आवाज वृत्तसेवा):- पुणे नाशिक या सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाचा शेती, उद्योग, व्यापार, शिक्षण व स्थानिक अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या परिणामाचा सविस्तर आलेखच आ अमोल खताळ यांनी दिल्लीतील लोकसभा सचिवालयात केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेत यांच्यासमोर मांडला.आणि हा पुणे नाशिक हाय स्पीड रेल्वे मार्ग हा संगमनेर मार्गेच ठेवण्याची मागणी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली त्यांनी या मागणीस सकारात्मक प्रतिसाद दिला आहे
संगमनेर हा पुणे-नाशिक दरम्यानचा सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. संगमनेर येथून दररोज हजारो प्रवासी पुणे आणि नाशिकला प्रवास करतात. तसेच, हा परिसर कृषी आणि औद्योगिक दृष्टिकोना तूनही अत्यंत महत्त्वाचा आहे. संगमनेर तालुका ड्रॅगनफ्रूट, द्राक्षे, डाळिंब, कांदा, भाजीपाला यांसारख्या शेतीच्या उत्पादनां साठी प्रसिद्ध आहे. या रेल्वे प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध होईल, तसेच वाहतूक खर्चात मोठी बचत होईल. औद्योगिक दृष्टिकोनातूनही हा मार्ग फायदेशीर असून, संगमनेर आणि आळेफाटा परिसरात मोठ्या प्रमाणावर उद्योग आहेत. रेल्वे मार्गामुळे उद्योगांना अधिक सुविधा मिळतील, परिणामी स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.याशिवाय, संगमनेर, जुन्नर, आंबेगाव आणि खेड या भागांतील विद्यार्थी शिक्षणासाठी पुणे-नाशिकला जातात. रेल्वेमुळे त्यांचा प्रवास अधिक सुलभ होईल. तसेच, पुणे-नाशिक रेल्वे मार्ग GMRT (Giant Metrewave Radio Telescope) मुळे अडथळा निर्माण होत असल्याचे वृत्तपत्रातून समोर आले होते. मात्र, या मुद्द्यावर सखोल चर्चा करून योग्य पर्याय काढण्याचा निर्णय रेल्वेमंत्री यांनी घेतला. संगमनेर, आळेफाटा, आंबेगाव, राजगुरु नगर या मार्गावरूनच रेल्वे जाईल, अशी खात्री आमदार अमोल खताळ यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना दिली.
संगमनेरसह परिसराच्या विकासासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे. “आम्ही सतत पाठपुरावा करत असून, पुणे ते नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे संगमनेर मार्गेच जाणार याचा आम्हाला विश्वास आहे. या निर्णयामुळे शेतकरी, उद्योगपती, व्यापारी, विद्यार्थी आणि प्रवासी यांना मोठा फायदा होणार आहे,” असे आमदार अमोल खताळ पाटील यांनी सांगितले.
यावेळी आमदार अमोल खताळ यांच्या समवेत सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ नेवासा मतदार संघाचे आमदार विठ्ठलराव लंघे हे देखील उपस्थित होते