अहिल्यागर( जनता आवाज वृत्तसेवा ):- केंद्र सरकारच्या डिजीटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर फॉर अॅग्रीक्लचर अंतर्गत संपूर्ण देशात ॲग्रीस्टॅग प्रकल्पाच्या अंमलबजावणीत सुरुवात झाली आहे. अहिल्यानगर जिल्ह्याने यामध्ये आघाडी घेवून ३ लाख २० हजार शेतक-यांना या योजनेत समाविष्ठ करुन घेण्यात आले आहे. ॲग्रीस्टॅग प्रकल्पात अहिल्यानगर जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक मिळविला असल्याची माहीती जलसंपदा तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
राहाता तालुक्यातील शेतक-यांना आयडी कार्ड देण्याचा शुभारंभ मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला. याप्रसंगी ह.भ.प उध्दव महाराज मंडलिक, जिल्हा अधिक्षक कृषि आधिकारी सुधाकर बोराळे, तालुका कृषि आधिकारी आबासाहेब भोरे याप्रसंगी उपस्थित होते. यावेळी प्रातिनिधीक स्वरुपात शेतक-यांना आयडीचे वाटप करण्यात आले. तालुक्यातील १६ हजार ८०९ शेतक-यांनी आपले आयडी कार्ड काढून घेतले आहेत.
या योजनेची माहीती देताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, या प्रकल्पाअंतर्गत शेतक-यांचे फार्मर आयडी तयार केले जात असून, या आयडीमध्ये शेतीसह शेतक-यांची मूलभूत माहीती समाविष्ठ केली जात आहे. या आयडी शिवाय आता सरकारी योजनांचा लाभ मिळणार नसुन शेती विषयक व्यवहारही या आयडी मार्फतच करता येणार असल्याने शेतक-यांनी आपले फार्मर आयडी काढून घ्यावेत असे आवाहन त्यांनी त्यांनी केले आहे.
शेतक-यांच्या अडचणी दुर करण्यासाठी केंद्र सरकारकडून ही योजना हाती घेण्यात आल्याचे सांगून मंत्री विखे पाटील म्हणाले की, या कार्डच्या माध्यमातून शेतक-यांना शेतीची सर्व कामे डिजीटल पध्दतीने करणे सोयीचे होणार आहे. जिल्ह्यात या योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरु झाल्यामुळे ३ लाख २० हजार शेतक-यांनी आपले आयडी कार्ड काढून या योजनेला प्रतिसाद दिला असल्याचे त्यांनी सांगितले.
डिजीटल कृषी मिशन अंतर्गत शेतक-यांना युनिक आयडी मिळणार असल्याने सुविधांचा लाभ घेणे व योजनेचा लाभही याच माध्यमातून मिळवणे शेतक-यांना अतिशय सोपे होईल. सरकारने जाहीर केलेल्या पिकांच्या नुकसान भरपाईचा लाभ तसेच शेती विषयक संरक्षण आदि सर्वच प्रकारच्या योजनांसाठी अॅग्रीस्टॅग प्रकल्प लाभदायक ठरणार असल्याने शेतक-यांनी आपले आयडीकार्ड काढून घेण्याचे आवाहन तालुका कृषी आधिकारी आबासाहेब भोरे यांनी यांनी केले आहे.