कोल्हार (जनता आवाज वृत्तसेवा) :- कोल्हार खुर्द येथे नव्याने उभारण्यात आलेले ग्रामसचिवालय हे गावाच्या विकासाचे केंद्र आहे. या माध्यमातून नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण होत असल्याचे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथे जलसंपदामंत्री ना. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. त्यांच्या शुभहस्ते कोल्हार खुर्द ग्राम सचिवालयाच्या नवीन वास्तूचा लोकार्पण सोहळा पार पडला. यानिमित्ताने गावांमध्ये ७६.५ लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोल्हार खुर्दच्या प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच सौ. अनिता दिगंबर शिरसाठ होत्या.
याप्रसंगी माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के, प्रवरा सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. भास्करराव खर्डे, राहुरीचे तहसीलदार नामदेव पाटील, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता बाळासाहेब शेटे, राहुरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे, सहाय्यक गटविकास अधिकारी एस. पी. तायडे, उपसरपंच सौ. विमल भोसले, उपविभागीय अभियंता एस. एस. घोरपडे, शाखा अभियंता के. जी. लांडे, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
ना. राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, समुद्रात वाया जाणारे अतिरिक्त पाणी भंडारदरा व निळवंडे धरणात आणणे गरजेचे आहे तरच पाण्याचे व्यवस्थित वितरण करता येईल. निळवंडे धरणातून पाईपलाईनद्वारे पाणी वितरित करण्याचे नियोजन आहे. यामुळे ३० ते ३५ टक्के पाण्याचा अपव्य टाळता येईल. नवीन तंत्रज्ञान वापरण्याची आवश्यक असून यावर विचार सुरू आहे. सद्यस्थितीत जल वितरणाकरता अनुसरण्यात आलेली स्काडा पद्धती का आपण स्वीकारली ? हे मला अजूनही समजत नाही. यावर संबंधित अधिकाऱ्यांनादेखील उत्तर देता येत नाही. मंत्रिमंडळाच्या बैठकीतदेखील आपण हा प्रश्न उपस्थित केला असल्याचे ते म्हणाले.
यावेळी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, दत्तात्रय शिरसाठ यांची भाषणे झाली. राहुरी पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रा. दिगंबर शिरसाठ यांनी प्रास्ताविकामध्ये कोल्हार खुर्द येथील स्मशानभूमीचा प्रश्न, घनकचरा व्यवस्थापन, पाण्याची टाकी नदीकिनारी बांधावयाची संरक्षक भिंत आणि जिल्हा परिषद शाळेचे बीओटी तत्त्वावर पुनर्निर्माण करून गाळे बांधण्याच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले. सूत्रसंचालन यमन पुलाटे यांनी केले तर उपस्थितांचे आभार माजी उपसरपंच राजेंद्र वर्पे यांनी मानले.




Total Users : 623993