सोलापूर, : नागुर (ता. अक्कलकोट) येथील नागोरे वस्तीमध्ये गावठाण वीजवाहिनी नसल्याने बसवराज प्रभू नागोरे यांच्या अडीच वर्षांपासून प्रलंबित घरगुती वीजजोडणीच्या मागणीला पालकमंत्री राधाकृष्ण विखे – पाटील यांच्यामुळे न्याय मिळाला. पालकमंत्र्यांच्या निर्देशानंतर नुकताच डीपी बसविण्यात आल्याने श्री. नागोरे यांना वीजजोडणी मिळाली.
श्री. नागोरे पूर्वी नागुर गावात राहायचे. साधारणतः अडीच ते तीन वर्षांपूर्वी ते नागोरे वस्तीवर राहायला आले. त्यामुळे घरगुती वीज जोडणी मिळावी म्हणून त्यांनी ७ जुलै २०२० रोजी महावितरणकडे अर्ज केला. गेली अडीच वर्षे ते पाठपुरावा करत होते. त्यांचे शेजारी बसवराज दनुरे यांच्यासोबत त्यांनी जिल्हा स्तरावर कार्यान्वित करण्यात आलेल्या पालकमंत्री संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून त्यांची व्यथा मांडली. तसेच, निवेदनाची प्रत पालकमंत्री यांना वैयक्तिकरीत्या पाठवली गेली. खुद्द पालकमंत्री श्री. विखे – पाटील यांनीच दखल घेतल्यामुळे त्यांच्या पाठपुराव्याला यश आले.





Total Users : 613856