कोपरगाव(जनता आवाज वृत्तसेवा):- तालुक्यातील दहेगाव बोलका येथील भिमराज बाळकृष्ण नवले वारकरी हे पायी दिंडी सोहळ्यात पंढरपूरच्या दिशेने जात असताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. ही घटना अहिल्यानगर तालुक्यातील दहेगाव येथे गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी नवले यांचे जावई रामदास कैलास नेहे (वय 28, रा. धोंडेवाडी जवळके ता. कोपरगाव जि. अहिल्यानगर) यांच्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि.27) अज्ञात वाहना विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मयत भीमराज नवले हे अधिष्ठाण अडबंगीनाथ पायी दिंडी सोहळा श्रीक्षेत्र धामानगर (धामोरी, ता.कोपरगाव) या दिंडी मध्ये 18 जून रोजी पढरपुर येथे पायी जात होते. बुधवारी दहिगाव ता. जि. अहिल्यानगर येथील म्हस्के वस्ती येथे मुक्कामी असताना गुरुवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास भिमराज नवले हे प्रातविधी करीता रोडच्या पलीकडे गेले होते. त्यानंतर काही वारकरी यांनी दिडीतील लोकांना सांगितले की, नवले यांना कोणत्यातरी अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने ते रोडवर पडले होते. नवले यांना खुप मार लागल्याने ते रक्तभंबाळ झाले होते. त्यांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले. दरम्यान दिंडी सोहळ्यातून पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला जात असताना रस्त्यातच झालेल्या अपघातातून भीमराज नवले यांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळवळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान मयत भीमराज नवले यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. वैजापूर येथील युवासेना पदाधिकारी संतोष बंगाळ यांचे ते काका होते.