राहुरी(जनता आवाज वृत्तसेवा) :-सद्या सत्तेबरोबर जाण्याचा राज्यभर ट्रेन्ड आहे. मी मात्र शेतकऱ्यांसाठी आयुष्यभर ज्यांनी काम केले. त्या शरद पवार यांच्याबरोबरच आहे आणि राहणार आहे. माझा हा निर्णय प्रवाहाच्या विरोधात असला तरी आपल्या मनाला जे पटतं ते आपण करतो. माझे काका अरूण तरपुरे यांच्या ताब्यात सभासदांनी तनपुरे कारखाना दिल्याने कारखाना सुरू करण्याच्यादृष्टीने ते अजित पवार यांच्या पक्षात गेले असावेत, असे स्पष्ट प्रतिक्रिया माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली आहे.
तनपुरे यांचे अनेक कार्यकर्ते तसेच कारखान्याचे संचालक, अनेक माजी नगरसेवक हे काल मुंबईत अजितदादांच्या गटात प्रवेशासाठी गेल्याचे वृत्त राहुरीत पसरल्यानंतर याची चर्चा सुरू झाली. लवकरच प्राजक्त तनपुरे हेही अजितदादा पवार यांच्या गटात जाणार, असेही बोलले जाऊ लागले.
याबाबत माजी मंत्री प्राजक्त तनपुरे म्हणाले की, तनपुरे कारखान्याच्या निवडणुकीत अरूण तनपुरे यांच्या पॅनेलला सभासदांनी निवडून दिले. त्यांच्यावर विश्वास दाखवला. त्यामुळे आता बंद पडलेला हा तनपुरे कारखाना सुरू करण्याची जबाबदारी अरूण तनपुरे यांच्यावर आलेली आहे.
सद्या राज्यात असणारे सरकार पाहता विरोधी पक्षातील लोकांना हे सरकार मदत करत नाही. त्यामुळे जर तनपुरे कारखाना सुरू करायचा असेल तर सरकारच्या मदतीची नितांत गरज आहे. त्यातच सहकार खाते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आहे. त्यामुळे अरूण तनपुरे यांनी अजितदादा पवार यांच्या गटात जाण्याचा निर्णय घेतला असावा, असे वाटते. त्यामुळे त्यांचे कार्यकर्ते, संचालक हे त्यांच्याबरोबर पक्षात जाणे साहजिक आहे. आपले कार्यकर्ते त्यांच्याबरोबर गेले असे म्हणता येणार नाही. काही चार-पाच माजी नगरसेवक हे त्यांच्याबरोबर गेल्याचे समजते. मात्र, बाकीचे माजी नगरसेवक व कार्यकर्ते आपल्याबरोबरच आहे.
शरद पवारांचे मोठे व्हिजन : तनपुरे
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शेतकऱ्यांसाठी मोठे काम केलेले आहे. अगदी एआयचे तंत्रज्ञान जे मेट्रोसिटीमध्ये चर्चिले जायचे. ते ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत आणण्याचे काम शरद पवार यांनी केलेले आहे. शहरामध्ये जे औद्योगिकरण दिसते, जे आयटी सेंटर दिसतात. हे शरद पवार यांचे व्हिजन असल्याचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे म्हणाले.
मुख्यमंत्री राहिलेले शरद पवार यांना शेतीतील खाचखळगा माहीत आहे. ‘पवार साहेब’ हा एक विचार आहे. हा विचार असा एकदम बाजूला करणे शक्य नाही. शिवाय मी एक साधा नगराध्यक्ष होतो. लोकांनी मला आमदार केल्यावर शरद पवार यांच्यामुळे मी पहिल्याच टर्मला नामदार झालो. त्या माध्यमातून मतदारसंघात मोठी कामे करता आली. ते मी कसे विसरू शकतो? त्यामुळे मी शरद पवार यांच्याच पक्षात राहणार आहे.
– प्राजक्त तनपुरे, माजी मंत्री