कोपरगाव (जनता आवाज वृत्तसेवा):-डॉक्टर म्हणजे केवळ औषध देणारे नव्हे , तर ते समाजाच्या आरोग्याचे खरे शिल्पकार असतात. संघर्ष आणि सत्व अंगी बाळगून ते समाजाला सेवा देत असतात. आयुर्वेदिक डॉक्टरांचा प्रवास सोपा नसतो. अनेक वेळा ग्रामीण भागांमध्ये वाहनांचा अभाव असतो. तरी सुद्धा रुग्णांना सेवा देण्याच्या पवित्र हेतूने ते जनसेवेचे कार्य करीत असतात. डॉक्टर म्हणजे माणसातील देवदूतच असतात, असे प्रतिपादन संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे विश्वस्त सुमित कोल्हे यांनी केले.
दि १ जुलै रोजी संजीवनी आयुर्वेदिक कॉलेजमध्ये डॉक्टर्स डे साजरा करण्यात आला. यावेळी श्री कोल्हे बोलत होते. या प्रसंगी मान्यवर डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला व त्यांच्या कार्याचे कौतुकही करण्यात आले. रुग्णांची सेवा घडावी, तसेच आयुर्वेदाचे डॉक्टर तयार व्हावे , या स्व. शंकरराव कोल्हे यांचे संकल्पनेतून संस्थेचे अध्यक्ष श्री नितीनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमितदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली हे महाविद्यालय योग्य दिशेने वाटचाल करीत आहे.
सदर प्रसंगी आयुर्वेदाचे शिक्षण घेणाऱ्या विध्यार्थ्यांना मार्दर्शनही करण्यात आले. विध्यार्थानी भविष्यात नामांकित डॉक्टर तर व्हावेच परंतु सेवाभाव बाळगावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली . या कार्यक्रमात डॉ. राम पवार, डॉ. फुलझुले , डॉ राबिया शिरगावे , डॉ. कौस्तुभ भोईर, डॉ. वैभव कवाळे , खंडांगळे व सर्व विध्यार्थी उपस्थित होते.