कोल्हार (जनता आवाज वृत्तसेवा):-जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव फुणगी येथील विद्यार्थ्यांना सहयोग क्रीडा मंडळ एरंडोली तालुका श्रीगोंदा यांच्यातर्फे शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कुठल्याही शैक्षणिक अनुपलब्धतेमुळे शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ येऊ नये , म्हणून सहयोग क्रीडा मंडळाचा हा अनोखा उपक्रम आहे ,असे प्रतिपादन मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आबासाहेब इथापे यांनी यावेळी केले.
शिस्त आणि मेहनतीच्या जोरावर आपण यश मिळवूच शकतो असे मंडळाचे सदस्य तथा खोखोचे राष्ट्रीय पंच राजेंद्र भालेराव यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले.
ग्रामीण भागातील आणि सर्वसामान्य परिस्थितीत, संघर्ष करता करता क्रीडा मंडळाला इतक्या यशाच्या शिखरापर्यंत नेल्याबद्दल पिंपळगावचे सरपंच शिवाजीराव जाधव यांनी इथापे यांचे कौतुक केले.
आधुनिक काळात अशा प्रकारचे दातृत्व असणाऱ्या कमी व्यक्ती असतात असे शाळेचे माजी मुख्याध्यापक अशोक भोसले यांनी व्यक्त केले.
सहयोग क्रीडा मंडळाची जडणघडण होत असताना आबासाहेब इथापे यांनी केलेला संघर्ष हा आजच्या पिढीसाठी मार्गदर्शक आणि दिशादर्शक आहे .खेळासोबतच अभ्यासासाठी आणि सामाजिक हितसंबंधासाठी मंडळाने केलेले आजपर्यंतचे उपक्रम हे अतुलनीय आहेत या शब्दात शाळेचे मुख्याध्यापक योगेश देशमुख यांनी सहयोग क्रीडा मंडळाचे आभार मानले.
सहयोग क्रीडा मंडळाच्या माध्यमातून आजपर्यंत अनेक राष्ट्रीय खेळाडू घडलेले आहेत .मंडळाच्या माध्यमातून अनेक मुले आणि मुली मोफत कबड्डी प्रशिक्षणाचे धडे घेत आहेत. मंडळाच्या अध्यक्षांनी राज्यभरातील अनेक गरीब विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन समाजसेवेचा वसा उचललेला आहे. गेल्या काही वर्षात मंडळाच्या वतीने अनेक राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन आणि पुरस्कारांचे वितरण करण्यात आलेले आहे.
कार्यक्रमाच्या प्रसंगी व्यवस्थापन समिती अध्यक्ष नंदूभाऊ वडितके ,सदस्य किशोर बोरुडे, संदीप तोरे महेश डमाळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
या अनोख्या कार्यक्रमाचे केंद्रप्रमुख निलिमा गायकवाड आणि गटशिक्षणाधिकारी मोहिनीराज तुंबारे यांनी कौतुक केले आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रकाश ब्राह्मणे, सुंदर सोबले, प्रल्हाद क्षीरसागर यांनी परिश्रम घेतले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गीताराम पवार यांनी केले.