लोणी(जनता आवाज वृत्तसेवा):-अखिल विश्वाला विश्वशांतीचा संदेश देणा-या संत ज्ञानेश्वरांच्या पसायदान रुपी प्रार्थनेचा जागर हजारो विद्यार्थ्यांनी केला. प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या सर्वच संस्था आणि महाविद्यालयांमध्ये संत ज्ञानेश्वरांच्या ७५० व्या जयंती दिना निमित्ताने हा अभिनव उपक्रम राबवून साघिंकपणे विद्यार्थ्यांनी पसायदान म्हटले.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जयंती दिनाच्या निमित्ताने राज्य सरकारने सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये पसायदानरुपी प्रार्थना आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या सर्व संस्थामध्ये या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
जलसंपदा तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण मंत्री विखे पाटील पुढाकाराने आणि संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुस्मिता विखे पाटील यांच्यासह प्रवरा शैक्षणिक संकुलातील सर्व शाळा महाविद्यालयामध्ये सकाळच्या सत्रामध्ये पसायदानरुपी प्रार्थना करण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये संत परंपरेची ओळख, अध्यात्मिक मूल्यांची जाणीव आणि सामाजिक एकतेचा संदेश पोहचावा हा उद्देश या पाठीमागे असल्याचे डॉ.सुस्मिता विखे पाटील म्हणाल्या.
प्रवरा शैक्षणिक संकुलातील प्रवरा कन्या विद्या मंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालय, प्रवरा गर्ल्स इंग्लिश मीडियम स्कुल लोणी आणि कनिष्ठ महाविद्यालयामध्ये एकत्रितपणे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुस्मिता विखे पाटील, शिक्षण संचालक डॉ.प्रदीप दिघे, शिक्षण संचालिका सौ.लीलावती सरोदे, प्राचार्या सौ.रेखा रत्नपारखी, सौ.विद्या घोरपडे आदींसह शिक्षक सहभागी झाले होते. याशिवाय प्रवरा पब्लिक स्कूल प्रवरानगर, प्रवरा सेंट्रल पब्लिक स्कूल, लोणी येथील विखे पाटील सैनिकी स्कूल या इंग्रजी शाळासह सर्व शाळा महाविद्यालयांमध्ये पसायदान म्हटले.
संस्थेच्या माध्यमातून संस्कारक्षम विद्यार्थी घडवण्यासाठी वेगवेगळ्या उपक्रमामध्ये प्रवरा शैक्षणिक संकुल हे कायमच प्रयत्नशील असते. यामुळे संस्कारक्षम शिक्षण देण्याबरोबरच संतांचे चरित्र आणि शिवरायांचे गड किल्ले त्याचबरोबर देशाची कला संस्कृती परंपरा याविषयीचेही ज्ञान प्रवरा शैक्षणिक संकुलाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दिले जाते. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून हर घर तिरंगा हे अभियानही संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात आले असल्याचे डॉ.सुस्मिता विखे पाटील यांनी सांगितले.