spot_img
spot_img

अस्मानी संकटावर निश्चितपणे मात करू – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील पालकमंत्री विखे पा. यांनी केली अतिवृष्टीग्रस्त गावांची पाहणी

शिर्डी(जनता आवाज वृत्तसेवा):– राहाता तालुक्यात शनिवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित गावांची जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज पाहणी केली. शेतकऱ्यांवर हे अस्मानी संकट कोसळले असून शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे व या संकटावर आपण निश्चितपणे मात करू, अशा शब्दांत त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला. अतिक्रमणामुळे बंद झालेले पाण्याचे मार्ग तातडीने खुले करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी प्रशासनाला दिल्या.

शनिवारी रात्रीपासून राहाता तालुका व परिसरात २०० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. रात्री उशिरा पावसाचे प्रमाण वाढत गेल्याने शेतात व वस्तीत पुराचे पाणी शिरले. या परिस्थितीवर तातडीने उपाययोजना करण्याबाबत पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांनी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया व जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना सूचना दिल्या आहेत.

लोणी, राहाता, कोल्हार व पाथरे या गावांमध्ये प्रत्यक्ष पाहणी करून डॉ. विखे पाटील यांनी प्रशासनासोबत परिस्थितीचा आढावा घेतला. कोल्हार येथे पाणी साचलेल्या भागातील नागरिकांना स्थलांतरित करण्यासाठी एनडीआरएफचे पथक दाखल झाले असून प्रशासनाने बोटी उपलब्ध करून दिल्या. स्थानिक युवकांनी अडकलेल्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम केले.

कोल्हार येथे नाल्यावर झालेल्या अतिक्रमणामुळे पाण्याचा निचरा होऊ शकला नाही. त्यामुळे पाणी शेतात व वस्तीत शिरल्याचे निदर्शनास आले. या पार्श्वभूमीवर पाण्याचे प्रवाह अतिक्रमणमुक्त करण्याचे आदेश पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांनी दिले. याप्रसंगी शिर्डी उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता काशीनाथ गुंजाळ आदी उपस्थित होते.

कोल्हार येथे त्यांच्या देखरेखीखाली जेसीबीद्वारे चर खोदणीचे काम सुरू करण्यात आले, ज्यामुळे राजुरी मार्गावरील साचलेले पाणी बाहेर काढण्यात यश आले. लोणी बुद्रुक गावातील परिस्थितीची पाहणी करून ग्रामस्थांसमवेत चर्चा केली व आवश्यकतेनुसार जेसीबी उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. पाथरे गावालाही भेट देऊन त्यांनी ग्रामस्थांना दिलासा दिला.

 

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!