संगमनेर(जनता आवाज वृत्तसेवा):-महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभाग (रोहयो प्रभाग) मार्फत ‘मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/पाणंद रस्ते योजना’ अंतर्गत 78 किलोमीटर रस्त्यांसाठी मंजुरी मिळाली आहे. आ. सत्यजीत तांबे यांच्या पाठपुराव्यामुळे संगमनेर तालुक्यातील तब्बल 64 गावांमध्ये छेद पाणंद रस्त्यांची कामे होणार असून या योजनेसाठी शासनाकडून सुमारे 14 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
यावेळी बोलतांना आ. तांबे म्हणाले की, संगमनेर तालुक्यातील ग्रामपंचायतींकडून आलेल्या मागण्यांचा सखोल अभ्यास करून ज्या ठिकाणी रस्त्यांची अत्यंत आवश्यकता आहे त्या गावांना प्राधान्य देण्यात आले आहे. ही कामे पूर्ण झाल्यानंतर केवळ शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावणार नाही तर ग्रामीण भागात आणि शेती उत्पादन वाहतुकीत मोठी क्रांती घडेल. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतीमाल वाहतुकीसाठी सुलभ रस्ते उपलब्ध होतील तसेच नागरिकांना दळणवळणाच्या सुविधा सुधारतील.
यामध्ये प्रामुख्याने जवळे कडलग, पिंपळगाव कोंझिरा, राजापूर, आश्वी, रायते, निमगाव भोजापूर, निमोण, नान्नज, कऱ्हे, सुकेवाडी, मालदाड, सायखिंडी, ढोलेवाडी, कासारा दुमाला, मिर्जापुर, चिखली, मंगळापुर, हिवरगाव पावसा, निमगाव खुर्द, धांदरफळ खुर्द, पेमगिरी, माळेगाव, पोखरी हवेली, मेंढवन, गुंजाळवाडी, दरेवाडी, कर्जुले पठार, साकुर, बिरेवाडी, जांबुत, घुलेवाडी, वेल्हाळे, कसारा दुमाला, सांगवी, मिर्झापूर, धांदरफळ बू, मंगळापुर, चिकनी, आभाळवाडी, वडगाव लांडगा, चिंचोली गुरव यांसह इतर गावांचा समावेश आहे.



