spot_img
spot_img

डोंगरगण घाटातील खुनाची उकल; वडील-भावानेच काढला किरणचा काटा

अहिल्यानगर(जनता आवाज वृत्तसेवा):– डोंगरगण घाटात गोणीत बांधून दरीत फेकलेल्या अनोळखी मृतदेहाच्या गूढ प्रकरणाची उकल स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या ४८ तासांत करत वडील आणि भावाला राहुरी तालुक्यातून जेरबंद केले. कुटुंबातील वादातून हा खून झाल्याची धक्कादायक कबुली तपासात समोर आली आहे.

दि. १७ फेब्रुवारी रोजी वांबोरी-डोंगरगण शिवारातील वन विभागाच्या हद्दीत, गट नं. ४७४ येथे ३५ ते ४० वर्षे वयोगटातील अनोळखी पुरुषाचा मृतदेह गोणीत बांधलेल्या अवस्थेत दरीत आढळून आला होता. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह फेकल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला होता. याप्रकरणी एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात गु.र.नं. १२०/२०२६, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०३(१), २३८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक नेमण्यात आले. पथकाने जिल्हाभरातील बेपत्ता व्यक्तींची माहिती तपासली असता टाकळीमिया (ता. राहुरी) येथील किरण शिवाजी कवाणे हा काही दिवसांपासून बेपत्ता असल्याचे निष्पन्न झाले.

त्यानुसार १९ फेब्रुवारी रोजी पोलिसांनी टाकळीमिया येथे कारवाई करत शिवाजी शंकर कवाणे (वय ५५) व योगेश शिवाजी कवाणे (वय ३०) या दोघांना ताब्यात घेतले. सखोल चौकशीत योगेश कवाणे याने भाऊ किरण हा नेहमी दारू पिऊन आई-वडिलांना मारहाण करत असल्याने वडिलांच्या मदतीने त्याचा खून केल्याची कबुली दिली.

खून केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी वापरलेली स्विफ्ट कार (एमएच 46 एक्स 7460) पोलिसांनी जप्त केली आहे. आरोपींना पुढील तपासासाठी एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. जिल्ह्यातील गंभीर गुन्ह्यांची तात्काळ उकल करण्याची पोलिसांची क्षमता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!